ठाणे - उल्हासनगर महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकासह त्यांच्या साथीदारांनी एका रिक्षा चालक तरुणाला बेदम मारहाण केली आहे. तसेच त्या तरुणाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली. याप्रकरणी नगरसेवकासह दोन जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. तर रविप्रकाश जयसिंघानी (२३) असे बेदम मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अंबरनाथ शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी असलेले परशुराम पाटील यांचे दोन्ही मुले आकाश व विकास हे २०१७ च्या उल्हासनगर महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर परशुराम पाटील यांची अंबरनाथ जुना गाव येथे चांगलीच दहशत आहे. तर बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास धर्माजी पाटील कॉलनी परिसरात राहणारा रिक्षा चालक रवि प्रकाश जयसिंघानी हा आपल्या घराबाहेर फिरत होता. त्यावेळी अचानक नगरसेवक आकाश पाटील याने जुन्या भांडणाचा राग मनात धरुन रवि जयसिंघानीला बाहेर का फिरतोस म्हणून हटकले आणि शिवीगाळ केली. त्यानंतर कंबरेचा पट्टा काढून रविला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आकाश पाटील यांच्यासोबत यश पाटील आणि परशुराम पाटील यांचा ड्रायव्हर मनिष यांनी देखिल रविला मारहाण केली. त्यांनतर त्याला जिवे ठार मारण्याची धमकीही दिली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपी अद्यापही अटक नाही ..
बेदम मारहाण झाल्यामुळे जखमी अवस्थेत रवि जयसिंघानी याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता, त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी नगरसेवक आकाश परशुराम पाटील. त्याचे साथीदार यश पाटील आणि मनिष यांच्या विरुध्द कलम ३२४,५०४ ,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आकाश पाटील हा शिवसेनेचा नगरसेवक असुन यांचा अंबरनाथ जुना गाव धर्माजी पाटील कॉलनीत चांगलाच दरारा आहे. त्यामुळे तेथिल नागरिक यांना घाबरुन असतात. मात्र अजुनही या आरोपींना पोलिसानी अटक केली नाही.