ठाणे - घरात घुसून 46 वर्षीय महिलेला मारहाण करत तिची गळा आवळून हत्या केल्याची घटना डोंबिवली पश्चिम कोपर रोड परिसरातील एका इमारतीच्या खोलीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यां विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दीड महिन्यात सहा महिलांच्या हत्येच्या घटना घडल्याने कल्याण-डोंबिवली शहरात खळबळ उडाली आहे.
टाळेमुळे बारमधील नोकरी गेल्याने विकत होती मच्छी
मृत महिला डोंबिवली पश्चिम भागातील कोपर रस्त्यावरील एका इमारतीमध्ये एकटीच राहत होती. ती उदरनिर्वाहासाठी कल्याणमधील एका बारमध्ये महिला वेटर म्हणून काम करत होती. मात्र, टाळेबंदीमुळे तिची बारमधील नोकरी गेल्याने गेल्या काही महिन्यांपासून ती राहत असलेल्या परिसरातच मच्छी विक्री करत उदरनिर्वाह करत होती. शुक्रवारी (दि. 19 मार्च) सांयकाळच्या सुमारास मृत महिलेच्या नातेवाईकांनी तीला मोबाईलवर संपर्क केला होता. मात्र, मोबाईल न उचलल्याने त्यांनी तिच्या घरी जाऊन पाहिले असता त्यांना ती महिला मृतावतस्थेत आढळली. तिच्या गळ्यावर, हातावर जखमा असून तिची साडीने गळा आवळून अज्ञात मारेकऱ्याने हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत अज्ञात हल्लेखोराचा शोध सुरू केला. दरम्यान, काहीच सुगावा नसल्याने तिची हत्या कोणी व का केली, याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.
कल्याण-डोंबिवलीत दीड महिन्यात सहा महिलांच्या हत्या
कल्याण-शिळ मार्गावरील निळजे परिसरात असलेल्या रेशनिंग दुकानातच एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. दुकानातील कामगाराला महिलेच्या हत्याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ताजी असतानाच पुन्हा डोंबिवलीच्या पश्चिम भागात घरात घुसून एका महिलेची हत्या झाली. मात्र, हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. तर तिसऱ्या घटनेत कल्याण पश्चिमेकडील सापर्डे गावात 21 फेब्रुवारीच्या मध्यरात्री सुवर्णा गोडे या 36 वर्षीही महिलेचा गोळ्या झाडून खून करणाऱ्या पवन म्हात्रे (21) याला खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यापूर्वी चौथ्या घटनेत 31 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कल्याण-शिळ मार्गावरील गोळवली परिसरात बळीराम पाटील या वृद्धाने पत्नी पार्वती हिचा खात्मा केला होता. तर पाचव्या घटनेत डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका परिसरात असलेल्या हरी म्हात्रे चाळीतील पतीनेच किरकोळ कारणावरून पत्नीची हत्या केली होती. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिवकुमार सरजु यादव (41) असे बेड्या ठोकलेल्या आरोपी पतीचे नाव आहे तर मिनिषा, असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. सहाव्या घटनेत कल्याण पश्चिम परिसरातील दत्ता आळीमध्ये राहणाऱ्या हंसाबेन प्रवीण ठक्कर या 80 वर्षीय वृद्धेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे 28 फेब्रुवारी सकाळी उघडकीस होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हेही वाचा - Antilia Scare : सचिन वाझे यांचे ठाण्यातील कार्यालय वर्षभरापासून बंद
हेही वाचा - चतुरस्त्र मुलाखतकार अशोक शेवडे यांचे निधन