ठाणे - ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूमुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून राज्य शासनाने रात्रीच्या वेळी संचारबंदी जाहीर केली आहे. अशातच कल्याण डोंबिवली महापालिका 55 नागरिक ब्रिटनहून परतले असून या नागरिकांची यादी राज्य शासनाने महापालिकेला पाठवली आहे. आता या सर्वांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणी दरम्यान या नागरिकांमध्ये काही लक्षणे दिसल्यास त्यांचे स्वॅब पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूने थैमान घातल्यानंतर हा विषाणू भारतात पसरू नये यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय विमाने सुरू असल्याने ब्रिटनमधून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या नागरिकांची विमानतळावर उतरल्यानंतर तपासणी करत लक्षणे आढळल्यास रुग्णांना विलगीकरणात पाठवण्यात येत आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्तींना होम क्वारन्टाइनचा सल्ला दिला जात आहे. दरम्यान विमानतळावर प्रवाशांची सर्व माहिती गोळा करून त्या त्या महापालिकांना या प्रवाशांचा डेटा पाठवण्यात आला आहे. तसेच संबंधित लोकांचे स्वॅब तपासणी करण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबरपर्यंत 55 नागरिक ब्रिटनमधून आल्याची यादी शासनाकडून धाडण्यात आली. या नागरिकांची नावे, पत्ते, फोन नंबरची यादी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आली असून संबंधितांशी संपर्क साधण्यात येत आहे. नागरिकांना संपर्क करून त्यांची पुन्हा टेस्टिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एखादा प्रवासी पॉझिटिव्ह आल्यास त्याचे जीन टेस्टिंगसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.
काही दिवसांपासून कोरोनाची संख्या घटत असतानाच हा प्रकार घडला आहे. कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगाने कमी होत असून सध्या 1000 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 55 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र या यादीमुळे यामुळे मागील 9 महिन्यानंतर आता कुठे कोरोनाची संख्या घटत असतांनाच पालिका प्रशासनाची झोप उडाली असून आरोग्य विभागाची धावपळ वाढली आहे.