कल्याण (ठाणे) - कल्याण रेल्वे स्थानकात दिवसभरात लाखो प्रवासी कामानिमित्त ये-जा करत असतात. याच प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी शेकडो रिक्षा वाहतूक नियमांचा भंग करून मिळेल त्या ठिकाणी रिक्षा उभ्या करताना दिसून येत आहे. त्यामुळे शेकडो रिक्षाच्या विळख्यातून रस्ता काढताना प्रवासी, बस चालक आणि रुग्णवाहिका चालकही मेटाकुटीला आला आहे. आता या रिक्षाचालकांना वाहतूक नियमांची शिस्त लावण्यासाठी वाहतूक विभागाने कंबर कसली असून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा पुन्हा अल्टीमेटम वाहतूक अधिकाऱ्याने दिला आहे. यामुळे येत्या काळात रिक्षाचालक खरच वाहतूक नियमांचे पालन करतील का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रिक्षा युनियनला राजकीय वरदहस्त
मुंबई उच्च न्यायालयाने मीटरनुसार रिक्षा भाडे आकारण्याचे आदेश एका याचिकेवर सुनावणीवेळी काही महिन्यांपूर्वी दिले आहेत. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतरही कल्याण डोंबिवलीत मात्र रिक्षाचालकांकडून मीटरप्रमाणे सेवा देण्यास प्रवाशांना नकार देत, अवाच्या सवा भाडे आकारण्यात येत आहे. यामुळे अनेकदा रिक्षाचालकांकडून प्रवाशांसोबत हुज्जत घालत प्रवाशांना दमदाटी आणि मारहाणही केली जाते. मात्र, सर्वच रिक्षा युनियनला राजकीय वरदहस्त असल्यामुळे रिक्षाचालकांची मनमानी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
रिक्षाचालकांची मुजोरी आजही कायम
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरासह रस्त्यावर आडव्या तिडव्या रिक्षा उभ्या करून वाहतूक कोंडी करणाऱ्या रिक्षाचालकांना आजवर अनेकदा शिस्त लावण्याचे प्रयत्न वाहतूक विभागाकडून करण्यात आले. तरीही रिक्षाचालकांची मुजोरी आजही कायम असल्याचे पहावयास मिळाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईसाठी कंबर कसली आहे.
एकाच रांगेत रिक्षा चालकांना प्रवाशांना द्यावी लागणार सेवा
कल्याण डोंबिवलीत रिक्षा चालकांनी ठराविक ठिकाणी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाच्या स्वतंत्र मार्गिका तयार केल्या होत्या. त्यातच आता कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात महापालिकेचे स्मार्ट सिटी योजनेतून काम सुरू असून या ठेकेदाराकडून वाहतूक पोलिसांनी लोखंडी बॅरीकेट बसवून स्टेशन परिसरात रिक्षा स्टॅण्डसाठी जागा निश्चित केली आहे. यामुळे 1 सप्टेंबरपासून कल्याण स्थानकात ठाणे स्थानकाप्रमाणे एका रांगेत रिक्षा चालकांना प्रवाशांना सेवा द्यावी लागणार आहे. स्टेशन परिसरात रांगेत उभे असणाऱ्या प्रवाशांना ज्या ठिकाणी जायचे आहे. त्या ठिकाणी रांगेतील रिक्षाचालकाने प्रवाशांना सेवा देणे बंधनकारक असणार आहे. रांगेशिवाय रिक्षा चालकांना प्रवासी भाडे घेता येणार नाही.
1 सप्टेंबरपासून वाहतूक नियमांची अमलबजावणी
रेल्वे स्थानकात आरटीओकडून ठरवून दिलेल्या भाडेदराचे पत्रक प्रसिद्ध केले जाणार असून या दराप्रमाणे भाडे आकारून प्रवाशांना सेवा द्यावी लागणार आहे. भाडे नाकारणाऱ्याला व रांगेबाहेर भाडे स्वीकारणाऱ्या रिक्षा चालकावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 1 सप्टेंबर, 2021 पासून या नियमांची अमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा - सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद