ठाणे - कोरोनाचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच येत्या काही दिवसांनी कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा या अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनजनची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक सुसज्ज ऑक्सिजन प्लांट उभारावा, अशी मागणी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी केली आहे. या संदर्भात शहरप्रमुख राजेश मोरे यांनी एका निवेदनपत्रद्वारे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे लक्ष वेधले आहे.
तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता-
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व हॉस्पिटल्समध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. परंतु सध्या हॉस्पिटलमध्ये जो ऑक्सिजन पुरवठा केला जातो तो अपुरा पडत आहे. त्यामुळे रुग्णालयात देखील ऑक्सिजन अभावी रुग्णांचा तडफडून मृत्यू होत आहे. (WHO) जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार काही येत्या दिवसांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे अशावेळी रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता भासणार आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता ग्राह्य धरून रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात एक सुसज्ज ऑक्सिजनचा नवीन प्लांट लवकरात लवकर उभारावा, अशी मागणी शहरप्रमुख राजेश मोरे यांनी त्यांच्या निवेदनातून केली आहे.
पत्रकारांना लसीकरणात प्राधान्य द्यावे ..
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे पत्रकार आहेत, त्यांचे बऱ्याच प्रमाणात लसीकरण बाकी आहेत. पत्रकार मंडळी रोज घराबाहेर पडून वृत्तसंकलन करत असतात. त्यामुळे आपल्याकडील पत्रकारांचेही फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांचेही काम चालू असते. त्यामुळे अशा सर्वच पत्रकारांना लसीकरण करण्यासाठी प्राधान्य द्यावे, याकडेही शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी निवेदनपत्रद्वारे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे लक्ष वेधले आहे.