ठाणे - ग्रीड फेल्युअरमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह बहुतांश शहरी भागात वीज गेली आहे. तर दुसरीकडे कल्याण शीळ रोडवर असलेल्या नेतेवली नजीकच्या टाटा पॉवर कंपनीकडून वीजपुरवठा होणारे 'केबी 1' व 'केबी 2' हे दोन फिडर बंद पडले आहेत.
केबी दोन फीडवरून कल्याण पश्चिमेला वीजपुरवठा होतो. मात्र या भागातील 50 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर 'केबी - 2'वरून कल्याण पूर्व परिसर व ग्रामीण भागातील वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र या विभागातील दहा हजार वीज ग्राहकांना फटका बसला आहे.
या दोन्ही फिटर वरील वीज ग्राहकांना पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरू करण्यात येत आहे. आतापर्यंत 16 हजार घरांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आल्याची माहिती टाटा पॉवरने दिली आहे. वरील फिडर वगळता इतर सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत असल्याचे टाटा पॉवर कंपनीकडून सांगण्यात आले.
आज सकाळी 10 च्या सुमारास संपूर्ण मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही तांत्रिक कारणांनी वीजपुरवठा खंडित झाला असताना वीज येण्यास बराच वेळ लागणार आहे. अशा वेळी कोविड केंद्रातील रुग्णसेवेबाबत प्रश्नचिन्ह आहे. मात्र, कोविड सेंटरमध्ये सर्व रुग्णसेवा सुरळीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. वीज गेल्याबरोबर जनरेटरची सुविधा सुरू करण्यात आली असून 8 ते 12 तास पुरेल इतका वीजपुरवठा असल्याचे कोविड सेंटरकडून सांगण्यात आले आहे.