ठाणे - पोर्तुगीज या देशातून भारतात सहलीसाठी आलेल्या एका विदेशी महिलेचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग (Molesting Portuguese woman) करण्यात आला होता. याप्रकरणी भारतीय सैन्य दलातील एका जवानाला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तीन वर्षांनंतर अटक (Indian Army man arrested) केली आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या शोधासाठी रेल्वे पोलिसांनी सोशल मीडियाची मदत घेतली होती. सहिश टी. असे अटक केलेल्या जवानाचे नाव आहे.
कल्याण- कासरा रेल्वे स्थानकदरम्यान घडला प्रकार - रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोर्तुगाल येथील रहिवासी असलेली पीडित महिला 2019 मध्ये भारतात सहलीसाठी आली होती. त्यातच 14 फेब्रुवारी 2019 रोजी ही पीडित महिला गोवा - दिल्ली निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत होती. प्रवासावेळी रात्री साडे अकराच्या सुमारास एक व्यक्तीने पीडित महिलेसोबत कल्याण- कासरा रेल्वे स्थानकदरम्यान अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला होता. घटनेनंतर पीडित महिलेने घडल्या प्रकाराबाबत भारतीय दूतावासात तक्रार केली होती. भारतीय दूतावासाने याबाबत त्यावेळी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. अनेक प्रकाराच्या प्रक्रिया करत या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र, हा आरोपी कोण आहे याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती नव्हती, कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती नव्हता.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीचा शोध - रेल्वे पोलिसांनी पीडिती महिलेशी संपर्क साधला तेव्हा, महिलेने आरोपीचे वर्णन सांगितले. त्या वर्णनाच्या आधारे कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या पथकाने तपास सुरू केला. आरोपीला शोधण्यासाठी अनेक युक्त्या लढवल्या . मात्र, आरोपीचा शोध लागत नव्हता. त्यामुळे वर्णनावरून आरोपीचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियाचा आधार रेल्वे पोलिसांनी घेतला. याच दरम्यान पोलिसांना जो मोबाईल नंबर मिळाला तो नंबर बंद होता. फेसबुकसह इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू केला.
अटक टाळण्यासाठी न्यायालयात जामीन अर्ज - सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीचा अखेर पोलिसांना शोध लागला. आरोपी भारतीय सैन्य दलातील केरळ युनिटमध्ये कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस तपास सुरू असताना आरोपी साहिशला कुणकुण लागली. त्यामुळे त्याने कल्याण न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला. हा अर्ज नामंजूर करण्यात आला. त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, त्याठिकाणी अटक पूर्व जामीन नामंजूर झाला. त्यातच रेल्वे पोलिसांना साहिश कल्याणमधील एका नातेवाईकांकडे लपून बसल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांच्या पथकाने त्याला सोमवारी नातेवाईकाच्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. आज आरोपीला कल्याणच्या रेल्वे न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली आहे.