ठाणे - कल्याण - डोंबिवली शहरात दुचाकी चोरांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन महिन्यांत अनेक दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी पुन्हा एकाद अशीच घटना घडली आहे. कल्याण पश्चिम परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. दुचाकी चोरताना एक चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून, आता पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्याचा शोध घेत आहेत.
सीसीटीव्हीत सापडला चोरटा
कल्याण पश्चिमच्या काळा तलाव परिसरात असलेल्या आयुष्य इमारतीमध्ये सुष्मा सिंग राहतात. त्यांनी मंगळवारी मोहिंदर सिंग काबुल सिंग हायस्कूल समोरील रस्त्यावर त्यांची स्कुटी दुपारी दीडच्या सुमारास पार्क केली होती. त्यानंतर त्या कामानिमित्त बाहेर गेल्या. सायंकाळी त्या स्कुटी घेण्यासाठी आल्या असता, स्कुटी जागेवर नसल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी याप्रकरणी बाजार पेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एका चोरटा स्कुटी घेऊन जात असल्याचे आढळून आले आहे.
इतरही गाडीचोरीचा तपास सुरू
दुसऱ्या एका घटनेत निशीकांत ससाणे यांची दुचाकी चोरीला गेली आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास कल्याण पश्चिम परिसरात त्यांनी आपली दुचाकी पार्क केली होती आणि ते कामानिमित्त बाहेर गेले होते. अवघ्या अर्ध्या तासामध्ये ते परतले. तोपर्यंत चोरांनी दुचाकी लंपास केली. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.