ठाणे - जर्मन शेफड (German Shepherds injure boy) जातीच्या श्वान हल्ल्यात सात वर्षाचा चिमुरडा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण (Kalyan Taluka) तालुक्यातील वरप (Varap Goan) गावात घडली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात (Kalyan Police Station) श्वानाच्या मालकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. देव पवार असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.
- अज्ञात व्यक्तीने हल्ला करून गंभीर केल्याची चर्चा -
कल्याण तालुक्यातील वरप गावात देव हा कुटूंबासह राहतो. रविवारच्या दिवशी देव हा त्याच्या घराशेजारी असलेल्या मैदानात खेळत होता. त्यावेळी जर्मन शेफड श्वानाने त्याच्यावर अचानक हल्ला केला. हा हल्ला एवढा भयंकर होता की, देवच्या कपाळाचे व डोक्याचे लचके तोडून श्वानाने पळ काढला. त्यानंतर ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरल्याने कोणी तरी अज्ञात व्यक्तीने देववर हल्ला करून त्याला गंभीर केल्याची चर्चा व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
- दाखल केला होता अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा -
गंभीर जखमी अवस्थेत देवला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला ठाण्यातील कळवा रुग्णालयात हलविण्यात आले. दोन दिवसांनी देव शुद्धीवर येताच श्वानाने हल्ला केल्याचे तो सांगत होता. मात्र त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष न देता, कोणी तरी अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हत्याराने हल्ला केला असावा असा कयास पोलिसांनी व्यक्त केला. तसेच कल्याण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात भादवी. कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
- देव शुद्धीवर आल्यानंतर माहिती आली समोर -
देव गंभीर जखमी असल्याने ३ दिवस त्याच्यावर कळव्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. आता त्याला उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्याच्यावर त्याच भागात राहणाऱ्या जर्मन शेफड जातीच्या श्वानाने हल्ला केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे आदी केलेल्या अज्ञात व्यक्ती विरोधातील गुन्ह्याच्या भादवी कलममध्ये बदल करून श्वानाच्या मालकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासह जर्मन शेफड श्वानाचा पोलिसांनी शोध सुरु केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांनी दिली आहे.