कल्याण डोंबिवली(ठाणे)- कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी ४९८ रुग्ण वाढले आहेत. दिवसभरात कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णसंख्येने १४ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ६२७ जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बुधवारी नव्याने आढळून आलेल्या ४९८ रुग्णांमुळे महापालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ७४ झाली आहे. यातील ६ हजार २९५ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. ७ हजार ५६३ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यत २१६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बुधवारी आढळलेल्या ४९८ रुग्णांमध्ये कल्याण पूर्व -१२४, कल्याण प.-१४३, डोंबिवली पूर्व -१२७, डोंबिवली प-७४, मांडा टिटवाळा- १२, मोहना – १५ तर पिसवली येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, महापालिका हद्दीत लॉकडाऊनसह धारावीच्या धर्तीवर गेल्या ४ दिवसापासून आरोग्य विभागासह विविध सामाजिक संघटना घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करीत आहेत. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात ५०० ते ६०० वर गेलेला रुग्णांचा आकडा दोन दिवसात साडे तीनशेवर आला होता. मात्र, पुन्हा त्यामध्ये १५० च्या जवळपास रुग्णांची भर पडल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.