ठाणे - कल्याण रेल्वे जंक्शनच्या पूर्व भागात असलेल्या रेल्वे यार्डमधील गोदामाला भीषण आग लागल्याची घटना आज (दि. 1 मे) दुपारच्या सुमारास समोर आली आहे . या गोदामात मोठ्या प्रमाणात केबल वायर साठवून ठेवलेल्या असल्याने आगीने भीषण रूप धारण केले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल होऊन आगीवर दोन ते अडीच तासांने नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र, तोपर्यंत गोदामातील लाखोंची केबल वायर जळून खाक झाली आहे.
वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली
कल्याण रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील 7 नंबर फलाटाच्या बाजूला मध्य रेल्वेच्या वरिष्ठ मंडळ विद्यूत अभियंता कार्यालय आहे. या कार्यालयाच्या लगतच रेल्वेच्या सिग्नलसाठी लागणारी काळी जाड वायर एका गोदामात साठवून ठेवली होती. त्यातच अचानक या केबलच्या गोदामाला दुपारच्या सुमारास आग लागली . आग लागल्याचे समजताच स्थानिक रेल्वेच्या अधिकाऱ्याने कल्याण-डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या कार्यालयाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल होऊन आगीवर दोन ते अडीच तासांत नियंत्रण मिळविले. विशेष म्हणजे वेळेतच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू आहे.
पसरताच उडाला गोंधळ
आगीची माहिती रेल्वे स्थानकात पसरताच गोधंळ उडाला होता. त्यामुळे रेल्वे पोलिसांसह स्थानिक कोळसेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, या घटनेत अद्याप कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत असून ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा - कोरोनाग्रस्त गरोदर महिलेची प्रसूती, आईसह बाळ सुखरूप