ठाणे - कल्याण डोंबिवली शहरातील मुस्लिम बांधवानी मनसेचे आमदारासह नगरसेवकांना राज ठाकरेंवर विश्वास ठेवून भरभरून मतदान केले. यामुळे २००९ साली कल्याण पश्चिम विधानसभेत मनसेचा आमदार निवडून आला. तर कल्याण ग्रामीणमधून सध्याचे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनाही ७ हजार मुस्लिम मतदारांनी मतदान केल्याने ते निवडून आले. असे असताना मशिदीवरील भोंगे उतरविण्याबाबत राज ठाकरेंनी गुडीपाडव्याला जे भाषणांतून व्यक्तव्य केले त्याबाबत आता मुस्लिम मतदार आम्हाला जाब विचारात असल्याची प्रतिक्रिया मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी सोशल मीडियावर व्हायरल करून नाराजी व्यक्त केली आहे.
व्हायरल झालेली प्रतिक्रिया इरफान शेख मनसेच्या स्थापनेपासूनच कट्टर राज समर्थक मानले जातात. मनसेच्या सुरुवातीला आक्रमक भूमिका घेऊन नागरिकांच्या समस्या घेऊन अनेक आंदोलन, मोर्चे, धरणे केल्याने त्यांच्यावर राजकीय गुन्हे दाखल होऊन जेलमध्येही जावे लागले. आता मात्र मशिदीवरील भोंगेच्या वक्तव्यावरून जो वाद निर्माण झाला. याची सर्वाधिक खंत राज ठाकरेंना मानणाऱ्या मुस्लिम वर्गाला वाटली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यावरून मुस्लिम समाजात नाराजी पसरली असून आता मनसेला मतदान करणारा मुस्लिम मतदार आमच्या सारख्या मनसे पदाधिकाऱ्यांना जाब विचारत आहेत. यामुळे येत्या दोन दिवसात मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करून नाराजी प्रकट केली.
हेही वाचा - Police Transfer : सात पोलिसांची तडकाफडकी बदली; मुंबई पोलीस आयुक्तांची कारवाई