जळगाव - दुष्काळामुळे शेतकऱ्याची ४ एकरावरची डाळींबाची बाग करपली आहे. एरंडोल तालुक्यातील पिंप्री बुद्रुक येथे ही घटना घडली असून वसंत पाटील, असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पाटील यांनी निमबटाईने, ही शेती घेतली होती. मात्र पाण्याअभावी त्यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.
पिंप्री गावातील शेतकरी वसंत पाटील यांनी चार एकर क्षेत्र निमबटाईने करायला घेतले होते. या बदल्यात त्यांनी शेतमालकाला दोन लाख रुपये आगाऊ रक्कम दिली होती. याच शेतात त्यांनी पाच वर्षांपूर्वी बागायती डाळिंबाची लागवड केली होती. डाळिंबाची झाडे उत्तम वाढली. झाडांना यावर्षी फळे येतील यामुळे पाटील यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र, दुष्काळाने त्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. यावर्षी एरंडोलमध्ये कमी पाऊस पडल्याने नोव्हेंबर महिन्यातच विहिरींनी तळ गाठला. परिणामी डाळिंबाच्या पिकाला देण्यासाठी पाणीच शिल्लक न राहिल्याने वसंत पाटील यांची संपूर्ण चार एकर क्षेत्रावरील डाळिंबाची बाग जळाली. निसर्गाच्या या अवकृपेने पाटील यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडेच मोडले गेले.
एरंडोल परिसरात यापूर्वी गिरणा नदीच्या पाटचारीमुळे शेती सुजलाम-सुफलाम होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गिरणेच्या पाण्यापासून शेतकरी वंचित आहे. सिंचनाचे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. यामुळे जमीन चांगली असूनही शेतकऱ्यांचे पाण्याअभावी नुकसान होत आहे. पंतप्रधान यांच्या गुजरातमध्ये तापी नदीवरून सिंचनाच्या सोयी आहेत. मात्र, महाराष्ट्रातून जाणाऱ्या तापीचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या संतप्त भावना आहेत.
जळगाव जिल्ह्यात यंदा ६३ टक्के इतकाच पाऊस पडला. यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीतही पाण्याचे दुर्भिक्ष आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांप्रमाणे एरंडोलमध्ये दुष्काळाची दाहकता आहे. निवडणुकांच्या धामधुमीत मात्र शेतकरी या घटकाकडे लोकप्रनिधींचे दुर्लक्ष होऊ नये, हीच अपेक्षा बळीराजाकडून व्यक्त केली जात आहे.