औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असता, आपली प्रत्येक गोष्ट निर्जंतुकीकरण असावी यासाठी औरंगाबादच्या छोट्या 'रँचो'ने हँड सॅनिटाईज मशीन तयार केली आहे. ज्यामध्ये वस्तूंपासून ते घरातील फर्शी देखील सॅनिटाईज केली जाते. औरंगाबाद शहरातील जुना मोंढा भागात राहणाऱ्या रोहीत पाटस्कर याने हे अनोखे गॅजेट तयार केले आहे. या गॅजेटला कोरोना किलर रोबो असे नाव दिले असून या रोबोच्या माध्यमातून घरातील वस्तू अवघ्या काही मिनिटात सॅनिटाईज केल्या जातात. त्यामुळे आपण कोरोनामुक्त राहण्यास मदत होईल, असा दावा रोहीत पाटस्करने केला आहे.
अतिनील किरणांमुळे कोरोनाप्रमाणे असंख्य विषाणू मानवी आरोग्यास धोकादायक आहेत ते नष्ट होतात. हे वैज्ञानिक पातळीवर सिद्ध तंत्रज्ञान आहे. या अल्ट्रा व्हॉयलेट रेमुळे न्यूक्लिक अॅसिड नष्ट होऊन आणि डीएनएमध्ये व्यत्यय आणून सूक्ष्मजीव निष्क्रिय होतात. याच अल्ट्रा व्हॉयलेट किरणांचा वापर करून रोहीतने हा रोबो तयार केला. या रोबोला चाकांच्या माध्यमातून स्वयंचलित करता येते. रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून त्याला घरातील जमिनीवर फिरवता येते. अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे जमिनीवरील जंतू नष्ट होतात. तर त्याच रोबोला एक हँडल लावले आहे. त्या हँडलच्या माध्यमातून घरातील रिमोट, टीव्ही, खुर्ची अश्या वस्तूंसह भाजी पाल्यावर 5 ते 6 सेकंद फिरवल्यास या सर्व गोष्टी निर्जंतूक करता येतात, असा दावा रोहीतने केला आहे.
रोहीत पाटस्कर हा अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहे. या आधी त्याने हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालू होणार नाही, असे गॅजेट तयार केले. तर पंख्याला लटकून आत्महत्या करता येणार नाही, असा पंखा त्याने तयार केला होता. असे अनेक गॅजेट किंवा रोबो त्याने तयार केल्याने रोहीत हा औरंगाबादचा रँचो म्हणून प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या भीतीत प्रत्येकाला आपले घर सुरक्षित ठेवता यावे यासाठी अवघ्या पाच हजार रुपयांमध्ये त्याने कोरोना किलर रोबो तयार केला. बाहेर जात असताना आपण सॅनिटायझर किंवा इतर साधन वापरून सुरक्षित राहतो. या रोबोमुळे आपले घर सुरक्षित ठेऊ शकतो, असा दावा रोहितने केला. रोहीत पाटस्करने तयार केलेला हा रोबो कसे काम करतो याबाबत आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी घेतलेला आढावा.