औरंगाबाद - भारत सरकारने तुमच्या भविष्यनिर्वाह निधीच्या रकमेची संचिका रद्दबातल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत आमच्या विभागाकडे पाठवली आहे. संचिकेत त्रुटी असल्याने ती रद्द होऊ नये, यासाठी तुम्हाला सव्वातीन लाखाच्या दहा टक्के रक्कम विभागाच्या खात्यावर विनाविलंब भरावी लागणार आहे, असे धमकावत दिल्लीतील दोन महिलांनी महावितरणच्या निवृत्त कनिष्ठ अभियंत्याला एक लाख चार हजाराचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडकोतील रहिवासी चंद्रशेखर दिगंबर दामोधरे (६०, रा. एन-३) हे महावितरणमधून कनिष्ठ अभियंता म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांना २० ऑगस्ट २०१८ ला सायंकाळी पाचच्या सुमारास फोनवर दिल्लीतील महिला शनया कौर हिने संपर्क साधला. त्यावेळी तिने पेन्शन फंड रेग्युलेरिटी डेव्हलपमेंट अॅथोरिटी येथून बोलत आहे, असे सांगत सविस्तर माहिती मागितली. सेवा निवृत्तीबाबत पूर्ण माहिती सांगत महाराष्ट्र सरकारने तुम्हाला भारत सरकारकडून मिळणारी भविष्य निर्वाहनिधीची रक्कम तीन लाख दहा हजार ६४८ रुपयांची संचिका राज्य शासनाने रद्द बातल करण्यासाठी आमच्या विभागाकडे पाठवली आहे. या संचिकेत त्रुटी असल्याने ती रद्दबातल होणार आहे. ही संचिका रद्द करावी का ? असे विचारताच तिला दामोधरे यांनी संचिका रद्द करु नका, संचिकेतील त्रुटी काय आहे ते मी पूर्ण करतो असे सांगितले.
त्यानंतर महिलेने सेवानिवृत्तीची तारीख, तसेच पेन्शन फंड संचिका क्रमांक, पूर्ण नाव व संपूर्ण माहिती तिने सांगितली. त्यामुळे तिच्यावर दामोधरे यांचा विश्वास बसला. पुढे तिने संचिका क्रमांक सांगत रक्कम खात्यात भरायची असल्यास मुळ रकमेच्या दहा टक्के रक्कम म्हणजे ३१ हजार ६४ रुपये विना विलंब भरा. तसेच ही रक्कम आपल्याला परत केली जाईल असे सांगितले. त्यानंतर २३ ऑगस्ट २०१८ला आर. टी. जी. एस.व्दारे दामोधरे यांनी विभागाच्या खात्यात रक्कम जमा केली. ४ सप्टेंबर २०१८ रोजी पुन्हा स्नेहा सिंग हिने फोन करुन तुमच्या सन २००२ च्या भविष्य निर्वाहनिधीच्या खात्यामध्ये ३१ हजार ६४८ रुपये तसेच १९ हजार पाचशे रुपये आणखी जमा झाले आहेत. दोन्ही रक्कम मिळुन चक्रवाढ व्याजापोटी ८० हजार पाचशे रुपये इतकी रक्कम जमा असल्याचे तिने दामोधरे यांना सांगितले. तसेच तिन्ही रकमांची एकुण रक्कम पाच लाख ८१ हजार ६४८ होत असल्याचे सांगितले. याशिवाय रकमेवर आपणास एक लाख चार हजार ६९६ रुपये एवढा आयकर भरावा लागणार आहे. पुर्वी भरलेली रक्कम ३१ हजार ६४ रुपये वजा करुन ७३ हजार ६३२ रुपये आपल्याला खात्यावर भरावी लागणार आहे, असे म्हटल्यावरुन ४ सप्टेंबर २०१८ रोजी दामोधरे यांनी पुन्हा बँक खात्यावर आर. टी. जी. एस. व्दारे रक्कम जमा केली.
स्नेहा सिंगने दर सोमवारी संपर्क साधून तुमची संचिका मंजुर होत असल्याचे आश्वासन दिले. २० सप्टेंबर २०१८ ला तिने पुन्हा फोन करुन सांगितले की, तुमची संचिका मंजुर झाली आहे. परंतू सेवा शुल्कापोटी तुम्हाला आणखी २५ हजार रुपये भरावे लागणार आहे. त्यामुळे दामोधरे यांना संशय आला. त्यांनी पेन्शन फंड रेग्युलेरिटी डेव्हलपमेंट अॅथोरिटीच्या वेबसाईट तपासणी केली. तेव्हा फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत त्यांना दोन महिलांनी एक लाख चार हजारांना गंडा घातला होता. दामोधरे यांनी रविवारी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील करत आहेत.