औरंगाबाद - चाळीस दिवसांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाईन कंपनीने एका महिलेची १ लाख ५६ हजार ६०० रुपयांची फसवणूक केली. महिलेने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केल्यानंतर याप्रकरणी तपास करुन क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे मोठ्या हॉटेलमध्ये सेमीनार घेतलेल्या कंपनीचे अधिकाऱ्यांचे काही महिन्यातच मोबाईल बंद झाले.
तेजस्वीनी सुधाकर गायकवाड (३८, रा. समर्थनगर) यांनी २०१७ मध्ये एस.एम.सी. ग्लोबल या कंपनीत डी.मॅट अकाऊंट उघडले. त्यानंतर शेअर ब्रोकर विश्वास बोबडे यांच्याशी त्यांची ओळख झाली. फेब्रुवारी २०१८ मध्ये बोबडे याने त्यांना युटूव्ही ऑनलाईन प्रा. लि. या कंपनी विषयी माहिती दिली. या कंपनीत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकीवर दामदुप्पट परतावा मिळतो, असे सांगितले. त्यानुसार गायकवाड यांनी मार्च २०१८ मध्ये कंपनीत ६ हजार ३०० रुपयांचे दोन आयडी (गुंतवणूकीचे फॉर्म) घेतले होते. कंपनीची वेबसाईटवर लॉगीनमध्ये त्याची स्थिती दर्शवली जात होती. त्यानुसार गायकवाड यांनी प्रती ८ हजार रुपयांचा एक आयडी असे २० आयडी विकत घेतले. त्यानंतर पहिल्या आठवड्यात त्यांच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यावर १६ हजार रुपये २ आठवड्यात जमा झाले. मात्र, त्यानंतर त्यांना कुठलाही परतावा आला नाही. त्यांनी अनेकदा कंपनीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.
गायकवाड यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. सहायक निरीक्षक अमोल सातोदकर यांनी तक्रारीचा सखोल तपास करुन क्रांतीचौक पोलीस ठाण्याकडे तक्रार वर्ग केली. क्रांतीचौक पोलीस ठाण्यात याप्रकरणी कंपनीच्या सतीश तिवारी (रा. सुलतानपूर, उत्तरप्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक निरीक्षक शांतीलाल राठोड पुढील तपास करत आहेत.
अशी होती योजना -
या योजनेत वीस प्रश्नोत्तर असणारा फॉर्म (आयडी) आठवड्यातून एकदा भरायचा द्यायचा होता. जो फार्म आयडी म्हणून ओळखला जायचा. आयडीच्या संख्येइतके फॉर्म भरुन देऊन रक्कम स्वत: च्या (गुंतवणूकदाराच्या) बँक खात्यात जमा करायची होती. अशा प्रकारे एक आयडी हा ४०० रुपयाप्रमाणे ४० आठवडे भरायचा होता. ४० वेळा फॉर्म भरुन प्रती फॉर्मचे बँक खात्यात पैसे जमा होणार होते. असे कोणी कितीही आयडी विकत घेवू शकत होता. त्यात ४० आठवड्यात रक्कम दुप्पट मिळेल, असे बोबडे यांने सांगितले होते. शहरात कंपनीत अशाप्रकारे गुंतवणूक करुन फसवणूक झालेले ५० पेक्षा अधिक असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.