औरंगाबाद (वैजापूर ) - वैजापूरच्या येवला रोडवरील भाजी मंडईतील फळविक्रेत्यांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे आज एका ४० वर्षीय महिलेला जीवाला मुकावे लागले. समोरून ट्रक येत असतानाही दुचाकीस्वाराला गाडी बाजूला घ्यायला जागा न मिळाल्याने अखेर त्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेला चिरडून हा ट्रक निघून गेला. आज शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
महिलेला ट्रकने चरडले - प्रतीक्षा राजेंद्र चौधरी (४०, रा. संभाजीनगर कॉलनी, वैजापूर) या आपल्या सासऱ्यांसोबत दुचाकीवरून येवला रोडने भाजी मंडईकडे जात होत्या. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (क्र. एम.पी. २० एचबी ८३१२) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. वेगात घडलेल्या या घटनेत दुचाकीस्वाराला गाडी बाजूला घ्यायला जागाच मिळाली नाही. आणि मागे बसलेल्या प्रतीक्षा खाली पडल्या. यावेळी ट्रक त्यांना चिरडून पसार झाला.
ट्रकचा पाठलाग करुन पोलिसांच्या ताब्यात - या अपघातात प्रतीक्षा चौधरी या जागीच ठार झाल्या. त्यांचे सासरे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. नंतर लोकांनी पसार झालेल्या ट्रकचा पाठलाग केला. चांडगाव येथील गणेश राहणे यांच्या मदतीने हा ट्रक येवला तालुक्यातील गवंडगाव येथे पकडून पोलिसांना कळविण्यात आले. अपघात झाल्यानंतर जवळपास ४५ मिनिटे अपघातातील जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळली नाही. शेवटी प्रदीर्घ वेळानंतर रुग्णवाहिकेत जखमींना उपचारासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रस्त्यावर फळे विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे रोज अपघात - भाज मंडई परिसरात फळ विक्रेत्यांच्या हात गाड्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या परिसरात रोज अपघात होत आहेत. यात फळविक्रेते रस्त्याच्या कडेला हातगाडी न लावता त्या रस्त्याच्या मध्यभागी उभ्या करून मनमानी करीत असल्याचा अनेकांचा आक्षेप आहे. मात्र त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. मात्र आज हा अपघात घडून महिलेचा बळी गेल्यावर जाग आलेल्या प्रशासनाने नंतर या भागात रस्त्यावर उभ्या असलेल्या हातगाड्या हलवल्याचे सांगण्यात येते.