कन्नड (औरंगाबाद) - शेतात काम करणाऱ्या तीन शेतकऱ्यांवर रानडुक्कराने पाठीमागून हल्ला केल्याने सदर शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना कन्नड तालुक्यातील बहिरगाव दाभाडी शिवारात घडली. या घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमी शेतकऱ्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कन्नड तालुक्यातील बहिरगाव दाभाडी शिवारातील एका शेतात काम करणाऱ्या तीन शेतकऱ्यांवर रानडुकराने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाले. तिन्ही जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. बाबूलाल विष्णू दापके (44) गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे. तसेच दामू म्हातरजी बनकर (50 रा. बहिरगाव) रत्नाबाई बाळू बनकर (45 रा. बहिरगाव) यांना किरकोळ स्वरूपात मार लागला. यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले.
हेही वाचा - दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यातून दोघांना अटक
सदरील घटनेची माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक सचिन शिंदे, वनपरीक्षेत्र अधिकारी काझी यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी प्रवीण कोळी, कन्नड वन रक्षक एम. ए. शेख यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केल. जखमी व्यक्तींची विचारपूस करून रितसर कारवाई केली आहे. जखमी व्यक्तींना शासन नियमानुसार नुकसान भरपाई वनविभागाच्या मार्फत दिली जाईल. तसेच सध्या शेतीकामांचा हंगाम असून शेतकऱ्यांनी शेतात जाताना, तसेच काम करताना काळजी घ्यावी. वन्य प्राण्यांच्या बाबतीत काही अडचण असल्यास वनविभागाला कळवावे, असे आवाहन साहयक वनसंरक्षक सचिन शिंदे यांनी केले आहे