औरंगाबाद - मराठा आरक्षण याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. मागील वर्षभरात नियोजन चुकल्याने त्याचा फटका आम्हाला बसला आहे. अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली.
सुप्रीम कोर्टात योग्य वेळी योग्य बाजू मांडली नाही
'मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मोठी लढाई मराठा समाजाने लढली आहे. उच्च न्यायालयात बाजू मांडताना ती योग्य पद्धतीने मांडली गेली. मात्र सर्वोच्च न्यायालयात मागील वर्षभरात बाजू मांडताना कुठलेही नियोजन करण्यात आले नाही. बाजू मांडताना अनेक चूका झाल्या. त्यामुळे आज त्याची किंमत मोजावी लागली', अशी प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी दिली.
न्यायालयाचा निर्णय बघून पुढील निर्णय
न्यायालयात याचिका सुनावणी होत असताना सादर केलेले मुद्दे न्यायालयाने विचारात घेतले नाहीत. राज्य मागास अहवाल, इंदिरा सहानी खटला यातील कोणतेच मुद्दे विचारात घेतले नाहीत. न्यायालयाने दिलेला निर्णय पूर्ण झाल्यावर, त्याबाबत कायदेतज्ञांचा सल्ला घेऊन पुढील दिशा ठरवू, सध्या संयम बाळगत आहोत. तरी संयम किती दिवस पाळायचा? हा प्रश्न असल्याचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - LIVE : मराठा आरक्षण रद्द; पाहा नेत्यांच्या प्रतिक्रिया..