औरंगाबाद - एसीबीसीच्या आरक्षणाला स्थगिती आहे. दुसरे कोणतेही आरक्षण मिळत नाही. ईडब्ल्यूएस आरक्षणसुद्धा सरकार मराठा समाजाच्या मुलांना देत नाही. त्यामुळे आज होत असलेल्या बैठकीत ईडब्ल्यूएस आरक्षण देण्याचा निर्णय घेण्याची मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे म्हणाले, की मराठा आरक्षणाबाबत बोलाविण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकांना बोलवले नाही. एकीकडे म्हणायचे तुम्ही सगळे एकत्र या आणि दुसरीकडे अनेकांना बैठकीत डावलून मराठा संघटनांमध्ये फूट पाडण्याचे काम हे सरकार करत आहे. काही जणांना बोलवले जाते. तर काही जणांना डावलले जाते. त्यात आमच्यातदेखील एकवाक्यता राहिली नाही. महाविकास आघाडीतील नेते मुद्दाम फूट पडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला.
हेही वाचा-मराठा आरक्षणासंदर्भातील नवीन विषयांवर चर्चा होऊन निर्णय अपेक्षित - अशोक चव्हाण
मराठा तरुणांच्या नोकरीचा मार्ग खुला करा...
महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या उपसमितीसोबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक सुरू आहे. मात्र, या बैठकीत काय मुद्दे आहेत? कोणते विषय आहेत? याची वाच्यता करण्यात आली नाही, असेही मेटे म्हणाले. ज्या मुलांची नोकर भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना नोकरीत समाविष्ट केले पाहिजे. मात्र तसे होत नाही. नुसती बैठक बोलवली जाते. असे न करता तुम्ही तात्काळ काय निर्णय घेणार आहात ते आधी घोषित करा. मराठा समाजाच्या मुलांचे प्रवेश कसे सुरक्षित करणार आहेत यावर भूमिका स्पष्ट करावी, अशीही मागणी मेटे यांनी यावेळी केली.
हेही वाचा-ओबीसींचा अंत पाहू नये, अन्यथा रस्त्यावर उतरू- प्रकाश शेंडगे यांचा निर्वाणीचा इशारा