औरंगाबाद - एका वकिलाला त्याची जात विचारल्यानंतर रो - हाऊस नाकारल्या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, बांधकाम व्यावसायिकांची चौकशी करत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर यांनी बुधवार दिनांक 12 जानेवारी रोजी दिली.
हेही वाचा - Corona Aurangabad : कोरोनामुळे मृतांपेक्षा मदत अर्ज तीनपट; अर्जांची शहानिशा करुन दिली जाणार मदत
वकिलाला नाकारले होते घर
पेशाने वकील असणाऱ्या अॅड महेंद्र गंडले यांनी जालना रस्त्यावरील एक रो हाऊस घेण्याबाबत विचारणा केली होती. घराची किंमत 30 लाख रुपये सांगितल्यानंतर त्यांनी घर विकत घेण्याची तयारी देखील दर्शवली. मात्र, त्यावेळेस तिथे काम करणार्या एका कर्मचार्याने त्यांना त्यांची जात विचारली आणि या जातीच्या लोकांना आम्ही घर देऊ शकत नाही, असे सांगितले. त्यावरून गंडले यांनी चिकलठाणा पोलिसात धाव घेऊन जातीमुळे घर नाकारल्याबाबत तक्रार दिली. त्यानंतर चिकलठाणा पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
दोघांना अटक
महेंद्र गंडले यांनी जालना रस्त्यावरील भूमी विश्वबन या उच्चभ्रू सोसायटीत घर पाहिले होते. त्यावेळेस तिथे काम करणाऱ्या सागर गायकवाड या युवकाने त्यांना घर देता येणार नाही असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी भाईश्री येथे जाऊन बांधकाम व्यावसायिक यांच्या मुख्य कार्यालयात चौकशी केली असता तिथे देखील त्यांना घर देता येणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्यावरून पोलिसांनी सागर गायकवाड आणि योगेश निमगुडे या दोघांना अटक केली आहे. तर, दिलेल्या तक्रारीत सोमानी, जैन, मकरंद देशपांडे आणि इतरांबाबत पोलीस चौकशी करत असल्याची माहिती उपअधीक्षक जयदत्त भवर यांनी सांगितली.
हेही वाचा - Omicron In Maharashtra : मराठवाड्यात ओमायक्रॉन रुग्णसंख्येत वाढ, उस्मानाबादेत सर्वाधिक रुग्ण