औरंगाबाद - हरसूल कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांपैकी पॅरोल आणि संचित रजेवर गेलेले १२ बंदिवान जेलमध्ये परतलेच नाहीत. गुन्हे शाखेकडून या फरार बंदी वानांचा शोध घेण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरात हरसूल जेलमधून विविध गुन्ह्यातील १२० कच्चे कैदी जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्यावरदेखील पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.
हरसूल कारागृहामध्ये विविध गुन्ह्यात शिक्षा ठोठावण्यात आलेले अनेक बंदिवान आहेत. यांना वर्षातून एकदा शासन नियमानुसार कुटुंबीयांना भेटण्यासाठी पॅरोल किंवा संचित रजेवर जाता येते. नियमानुसार रजा संपल्यानंतर त्यांना उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात येणे आवश्यक असते. मात्र, हरसूल जेलमधून पॅरोल किंवा संचित रजेवर बाहेर पडल्यानंतर १२ बंदीवान पुन्हा माघारी आलेच नाहीत.
बंदीवानांना शोधणार विशेष पथक -
काही बंदीवान अनेक वर्षापासून फरार आहेत. शहर गुन्हे शाखेच्या वतीने या फरार बंदीवांनासाठी शोध मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी विशेष पथक म्हणून नेमण्यात आलेल्या 'सोनिया' पथकामार्फत गेल्या अनेक वर्षापासून फरार असलेल्या बंदीवानांचा शोध घेण्यात येणार आहे.
फरार असलेल्या १२ बंदीवानांची नावे -
बाबुराव केरबा निकाळजे, मोहम्मद अल्तमश मोहम्मद इस्माईल, बशीर खान कदीर खान, शेख फैय्याज शेख रज्जाक, उत्तम मुंजाजी डाखोरे, गंगाधर ऊर्फ गंगाप्रसाद विश्वंभर गायकवाड, आप्पा कचरू चुंबळे, सय्यद वजीर सय्यद नाजीम, रियाज बेगम मोहम्मद इस्माईल, राजू उर्फ डोळ्या धम्मा भोजया, कटम रेड्डी पट्टाभीम रेड्डी, काड्या उर्फ लक्ष्मण महादेव वैरांगणे.