औरंगाबाद - गंगापूर वैजापूर रोडवर गंगापूर शहराजवळ दहा किलोमीटर अंतरावर उसाचा भरलेला ट्रक व पिकअप टेम्पोचा भीषण अपघात रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडला. या अपघातात पिकअप टेम्पोमधील तीन जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रोहित अरविंद सुरवसे, आकाश क्षीरसागर, गणेश पप्पू शिरसाठ, असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नाव आहे. शिवशंकर संघवी हा गंभीर जखमी झाला आहे.
हेही वाचा - Arrested Robbing Gold In Aurangabad : सुपारी घेऊन व्यापाऱ्याचे सोने लुटणाऱ्यांना अटक
भीषण अपघातात पिकअप टेम्पोचा चुराडा
गंगापूर वैजापूर मार्गावर रात्री दहा वाजेच्या दरम्यान वैजापूरकडे जाणारा उसाचा ट्रक (क्रमांक एम.एच.१८ ए.ए.२७३७) व वैजापूरकडून गंगापूरकडे जाणाऱ्या पिकप टेम्पो (क्रमांक एम. एच.१३ सी.यू. १५००) यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती कळताच डॉ. प्रशांत पंडुरे, सचिन सुरवसे, आनंता कूमावत, अजीम पटेल, आदींनी पिकअप टेम्पोमधील गंभीर जखमींना उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तिघांना तपासून मृत घोषित केले व गंभीर जखमी असलेल्या शिवशंकर संघवी यास प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालय (घाटी) येथे पाठवण्यात आले.
हा अपघात इतका भीषण होता की यात टेम्पोच्या पुढच्या भागाचा चुरा झाला आहे. उसाचा ट्रक पलटी होऊन ऊस रस्त्यावर पसरल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघाताचा पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहे. गंगापूर वैजापूर मार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. गतिरोधक, डिव्हायडर नसलेल्या या रोडवर सुसाट वेगाने वाहनांची मोठ्या संख्येने वर्दळ सुरूच असते. अपघाताचे प्रमाण वाढले आहे.