औरंगाबाद - मित्रांचा वाढदिवस म्हणले की छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. असाच एक कार्यक्रम ब्रह्मगव्हाण व नदीकाठ वस्ती येथील जिल्हापरिषदेच्या वतीने घेण्यात आला. मात्र, हा कार्यक्रम कोणत्या साहेबांच्या नव्हे, तर झाडांच्या जन्मदिवसाचा कार्यक्रम होता. यावेळी झाडांना पोषक अशा सेंद्रिय खतांचा केकदेखील कापण्यात आला.
झाडांच्या वाढदिवसानिमित्त नदीकाठावर खास मंडप उभारण्यात आला. फुलांची आरास, रांगोळी व सुंदर सजावटही करण्यात आली. जणू एखाद्या नेत्यांचा किंवा पुढाऱ्याचा वाढदिवस असेल असे वातावरण दिसून आले. या कार्यक्रमात आसपासचे लोकदेखील बोलाविण्यात आले होते. महिलांनी झाडांना औक्षण केले. झाडांचा वाढदिवस धूमधडाक्यात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात झाला. अशा पद्धतीने शाळांत वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संगोपन व संवर्धनही गरजेचे असल्याचा महत्त्वाचा सामाजिक संदेश देण्यात आला. ब्रह्मगव्हाण व नदीकाठ वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाडांचाच पहिला वाढदिवस साजरा करणारा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा झाला. वृक्षारोपण करणाऱ्या सर्वांना प्रेरणा मिळावी, यासाठी अनोखा सोहळा साजरा झाल्याचे मुख्याध्यापक महेश लबडे यांनी सांगितले.
हेही वाचा-कोरोनाची दुसरी लाट संपेना; 24 तासात आढळले नवे 46,164 रुग्ण
झाडांसाठी कापला सेंद्रिय खतांचा केक...
वाढदिवस म्हणले, की नेहमी केक असतो. वाढदिवसाच्या कार्यक्रमात झाडांना खाता येईल, असा सेंद्रिय खतांचा केक झाडाजवळ कापण्यात आला. वाढदिवस हा झाडांचा असल्याने त्यांनाही आनंदाने खाता आला पाहिजे, असा सेंद्रिय खतांचा केक सहशिक्षक रवी केदारे यांनी बनविला. हा कार्यक्रमातील पाहुण्यांमध्ये कौतुकाचा विषय ठरला. झाडांप्रती शिक्षकांमध्ये असलेली संवेदनशीलता व आत्मीयता यातून प्रतीत झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. उपस्थितांना खाण्यासाठीदेखील वेगळा केक कापण्यात आला.
हेही वाचा-मलाबार नौदल सरावात भारतासह चार देशांचा सहभाग; चीनकडून तिबेटमध्ये युद्धसराव
मागील वर्षी केली होती वृक्ष लागवड....
मागील वर्षी 26 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद, वन विभाग, इकोसत्व, ग्राइंड मास्टर, व कारपे आदी संस्थांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ब्रह्मगव्हाण व नदीकाठ वस्ती या दोन्ही शाळांत वृक्षलागवड करण्यात आली होती. प्रत्येकी 2000 चौरस फुटांत 600 पेक्षा अधिक देशी वनस्पतींची मियावाकी घनवन पद्धतीने लागवड झाली होती. या विशिष्ट तांत्रिक पद्धतीने लागवड झाल्याने व यशस्वीरीत्या संगोपन झाल्याने एका वर्षात झाडांची उंची 20 फुटांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे अत्यंत घनदाट जंगल तयार झाले आहे.
हेही वाचा-जातीनिहाय जनगणेवरून बिहारमध्ये राजकारण: भाजपने पक्षांतर्गत मतभेद सोडवावेत- उपेंद्र कुशवाह
कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी श्रीराम केदार, शिक्षण विस्ताराधिकारी अनिल पुदाट, इकोसत्व व कारपे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नताशा झरिन, ग्राइंड मास्टर कंपनीचे व्यवस्थापक महेश सहस्रबुद्धे, केंद्रप्रमुख मनोजकुमार सरग, शिक्षक सेना तालुकाप्रमुख अमोल एरंडे, कार्याध्यक्ष अमोलराज शेळके, यांच्यासह लोहगाव केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.