गंगापूर (औरंगाबाद) : गंगापूर येथे एका तरुणाने व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मजकुर ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरुणाने 10 जून 2022 रोजीचे रात्री 11 वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मजकुराचे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. एका गटाच्या 12 ते 15 तरुणांनी स्टेटस ठेवणाऱ्या तरुणास मारहाण करून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी पोलीस ठाणे गंगापूर येथे पंधरा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गंगापूर शहरात व संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात दंगा नियंत्रक पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच स्टेटस ठेवणाऱ्या तरुणावरदेखील गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी घेतली गंभीर दखल : ही घटना घडताच ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवाणीया, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, पोउपनि विलास गुसिंगे, पोहेकॉ कैलास निंभोरकर, प्रकाश बर्डे, पोना योगेश हरणे, पोअं बलबिरसिंग बहुरे, रिजवान शेख यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणुन, गुन्हा करून फरार झालेल्या आरोपींपैकी 11 आरोपींना रात्रीतून शिताफीने शोध घेऊन गुन्ह्यात अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा तपास चालू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास अपर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक चौरे करीत आहेत.
त्या तरुणावरदेखील गुन्हा दाखल : गंगापूर येथे मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावण्यास कारणीभूत झालेल्या तरुणाविरुद्ध गु. रजि.नंबर 223/2022 कलम 295 अ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. गंगापूर शहरात व संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात दंगा काबू पथके व ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे पोलीस अधीक्षक मनीष कलवाणीया यांनी सांगितले. तसेच त्याला मारहाण करणाऱ्या आरोपींनादेखील पोलिसांनी अटक केली आहे.
आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई : पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण मनीष कलवानीया व अपर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यातील जनतेस शांततेचे आवाहन केले असून, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामव्दारे आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व शांतता भंग करणाऱ्या व प्रसारमाध्यमाव्दारे किंवा कोणत्याही प्रकारे आक्षेपार्ह वक्तव्य, मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.