औरंगाबाद - शहरातील औषधी भवन परिसरात दोन वर्षांच्या चिमुकलीला उचलून खोलीत नेऊन तिला मारहाण करत लाकडी कपाटात कोंडल्याची ( little girl locked in cupboard in Aurangabad ) धक्कादायक घटना समोर आली आहे. तिच्या रडण्याचा आवाज एकून स्थानिकांनी दरवाजा तोडून तिला बाहेर काढले. त्यानंतर खोलीवर राहणाऱ्या अंदाजे ३५ ते ३८ वर्षांच्या पुरुषाचा शोधून नागरिकांनी त्याला चोप ( Citizens beat the accused ) देत क्रांतीचौक पोलिसांच्या ( Krantichowk police ) ताब्यात दिले.
चिमुकलीला केले कपाटात बंद -
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, औषधी भवन परिसरात सहा दिवसांपूर्वी एक 42 वर्षीय व्यक्ती राहण्यासाठी आला. दरम्यान शनिवार दि.२७ संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका कुटुंबातील दोन वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाली. कुटुंबाने टाहो फोडताच परिसरातील नागरिक एकत्र आले व चिमुकलीच्या शोधासाठी सगळ्यांनीच प्रयत्न सुरू केले. परिसरात नुकताच भाडेतत्त्वावर राहण्यासाठी आलेल्या अंदाजे ३५ वर्षे एका पुरुषाच्या खोलीतून एका मुलीचा रडण्याचा आवाज स्थानिकांना ऐकू आला. खोलीचा दरवाजा मात्र बाहेरून बंद होता. एकूणच प्रकार संशयास्पद वाटल्याने स्थानिकांनी दरवाजा तोडला. त्यानंतर आवाज येणाऱ्या दिशेने त्यांनी धाव घेतली असता खोलीतील एका लाकडी कपाटातून चिमुकलीचा रडण्याचा आवाज येत होता. त्यांनी तत्काळ कपाट उघडल्यावर दोन वर्षांची चिमुकली कपाटात आढळून आली. तेव्हा तिच्या नाकातून रक्तस्राव होत होते. त्या खोलीत नुकताच राहायला आलेल्या संशयिताने हा प्रकार केल्याचे नागरिकांना स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देऊन स्थानिकांनी संशयितांचा शोध सुरू केला.
नागरिकांनी आरोपीला बेदम चोपले -
या धक्कादायक घटनेनंतर मुलीच्या कुटुंबासह परिसरातील नागरिकांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी संशयिताला त्यांच्या वाहनात टाकल्यानंतर देखील नागरिकांनी पोलिसांच्या वाहनात घुसून त्याला बेदम चोप दिला. एकूण घटनेनंतर क्रांती चौक पोलिसांनी त्याला अधिकृत ताब्यात घेत घाटी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त नागरिकांनी त्याला घाटीत गाठत तिथेदेखील चोपण्याचा प्रयत्न केला.
यापूर्वी देखील संशयिताने केला घाणेरडा प्रकार -
पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या काही महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित 42 वर्ष पुरुष निराला बाजार परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करतो. पाच ते सहा दिवसांपूर्वी परिसरात राहिला आलेल्या हा संशयित आल्यापासून आक्षेपार्ह वर्तुनूक करत होता. पैसे मोजण्याचे बहाण्याने दोन दिवसापूर्वी त्याने एका मुलीला घरात बोलवले होते. त्यादरम्यान देखील तो अर्धनग्न अवस्थेत आढळला होता. तेव्हाच स्थानिकांनी संबंधित घरमालकाला तुमचा भाडेकरू आक्षेपार्ह वर्तन करत असल्याची कल्पना दिली होती. मात्र त्यानंतर देखील घर मालकाने ठोस निर्णय घेतला नाही, असा आरोप महिलांनी केला.