औरंगाबाद - कृत्रिम पावसाच्या नावावर सरकार मराठवाड्याच्या जनतेची दिशाभूल करत असल्याचे समोर आले आहे. मागील शुक्रवारी कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात केली आहे, असे प्रशासनाने सांगितले असले तरी प्रत्यक्षात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात झालेली नाही. औरंगाबाद विमानतळावर पूर्णवेळ कार्यरत असणारे विमान अद्याप सौदी अरेबियात असल्याची माहिती समोर आली आहे. हे विमान 18 ऑगस्टला औरंगाबादमध्ये दाखल होईल. सध्या वापरण्यात येणारे विमान चाचणीसाठी आल्याचे समोर आले आहे. यावरून सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा नुसता देखावा केल्याचे दिसत आहे.
चार दिवस औरंगाबाद विमानतळावरून आकाशात प्रयोगासाठी उडालेले विमान सोलापूरमध्ये असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचे (आयआयटीएम) असल्याची माहिती मिळाली आहे. त्या विमानाच्या सहाय्याने पाऊस पडला नसल्याने तेही विमान परतले आहे.
मराठवाड्याच्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेता यंदा राज्य सरकारने 31 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील आवर्षणग्रस्त भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला. यासाठी केसीएमसी या कंपनीला कृत्रिम पाऊस पाडण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. अर्धा पावसाळा उलटला तरीही मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि चंद्रकांत पाटील यांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या घोषणा केली होती. ९ ऑगस्टला विमान औरंगाबाद विमानतळावरून हवेत झेपावले. चार दिवस हे विमान पाऊस पाडण्यासाठी उडत होते. मात्र, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीचे सर्व प्रयत्न अपयशी झाले आहेत. राज्य शासनाने ज्या केसीएमसी कंपनीला कंत्राट दिले आहे, त्या कंपनीचे विमान १७ ऑगस्टमध्ये येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे विमान सध्या सौदी अरेबियात आहे. त्यानंतर ते अहमदाबादला येईल. तिथे सीमाशुल्क विभागाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर औरंगाबादमध्ये दाखल होईल. त्यानंतर कृत्रिम पावसाच्या खऱ्या प्रयोगाला सुरुवात होईल.
दरम्यान, अमेरिकेहून विमान सौदी अरेबियात दाखल झाले आहे. त्याठिकाणी सध्या विमानातील तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. १७ तारखेला हे विमान भारतात दाखल होईल. अहमदाबादमध्ये सीमाशुल्क विभागाच्या प्रक्रिया पूर्ण करून १८ तारखेला विमान औरंगाबाद विमानतळावर प्रयोगासाठी सज्ज असेल असे सांगण्यात येत आहे.