औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग आता वेगाने वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे, यात पोलीस विभाग देखील मागे नाही. मालेगाव येथील बंदोबस्तासाठी औरंगाबादमधून गेलेले 'भारत बटालियन'चे जवान शहरात परतले आहेत. या सर्वांना आता सुरक्षितता म्हणून क्वारंटाईन केले आहे. इतकेच नाही तर वाहने आणि जवानांचे शस्त्रे यांवर देखील फवारणी करून निर्जंतुकीकरण केले आहे.
हेही वाचा... मुंबई, पुण्यातील दारुविक्रीबाबत चद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले...
मालेगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी औरंगाबाद येथून भारत बटालियनचे 96 जवान पाठवण्यात आले होते. तेथील बंदोबस्ताचे काम झाल्यानंतर त्यांना औरंगाबादला परत बोलावण्यात आले आहे. मात्र, मालेगाव येथील कोरोनाची परिस्थिती पाहता बंदोबस्तासाठी या जवानांची विशेष काळजी घेतली जात आहे. या सर्व जवानांची वैद्यकीय तपासणी देखील केली जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेलेल्या जवानांना मास्क, सॅनिटायझर आणि इतर साहित्य वाटपासाठी एक जवान पाठवण्यात आला होता. तो औरंगाबादला आल्यावर त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात त्या जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे या बटालियनमधील संबंधीत जवानाच्या संपर्कात आलेल्या 64 जवानांना अगोदरच क्वारंटाईन करण्यात आले होते.
बुधवारी या भारत बटालियनची 96 जवानांची तुकडी परत आली आहे. मात्र, या जवानांच्या आरोग्याची काळजी आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी त्यांना श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालयात अलगिकरन कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच आज आलेल्या 96 जवानांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील खबरदारी घेण्यात येईल, असे बटालियनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.