औरंगाबाद - ओमिक्रॉनची लाट मोठ्या ( Omicron Increase In Aurangabad ) प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा तिसऱ्या लाटेत लहान मूल बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे. लहान मुलांमधील ( Infection In Small Kids ) संक्रमणासंदर्भात विशेष काळजी घेण्याचा सल्ला बालरोग तज्ञांनी दिला आहे.
लहान मूल होत आहेत बाधित -
कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये लहान मूल बाधित होण्याचे प्रमाण कमी होत. मात्र, यावेळी आलेल्या लाटेत लहान मूलदेखील बाधित होत आहेत. औरंगाबादमध्ये गेल्या आठवड्याभरात 0 ते 6 वयोगटातील 18 मुले कोरोनाबाधित झाले आहेत. तर 6 ते 15 वयोगटातील 150वर मुले बाधित झाले आहेत. त्यामुळे लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याचे डॉक्टर सांगत आहेत. ताप 102 पेक्षा जास्त सलग असणे, सर्दी खोकला असणे, जेवण न करणे, सतत ग्लानीत असणे, ही लक्षणे असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेच असल्याचे बालरोग तज्ञ डॉ. मंदार देशपांडे यांनी सांगितले.
ही आहेत लक्षणे -
ओमिक्रॉनबाधीत 80 टक्के रुग्णांना सर्दी होते. 10 टक्के रुग्णांना थंडी वाजून ताप येतो. तर 10 टक्के रुग्णात जुलाब, उलट्या आणि थकवा अशी लक्षणे दिसतात. ओमिक्रॉनची लहान मुलांमध्ये ठळकपणे दिसणारी लक्षणे म्हणजे ताप, सर्दी, अंगदुखी, घशात खवखव, उलटी जुलाब, लघवी कमी होणे, थकवा जाणवणे अशी लक्षण प्रामुख्याने जाणवतात.
हे करावेत उपाय -
कोरोनाबाधित मुलांना 7 दिवस विलगीकरणात ठेवावे. मुलासोबत राहणाऱ्या व्यक्तीने पूर्ण वेळ मास्क घालूनच रहावे. डॉक्टरांनी दिलेली औषधं मुलाला वेळेवर द्यावीत, साधे पाणी, नारळ पाणी, फळांचा रस, ओआरएस सूप असे देत त्याला हाइड्रेटेड ठेवावे. ताप १०२च्यावर जाऊ देऊ नये. ताप जर 102च्यावर जात असेल, तर लगेच स्पंजिंग करावे. मात्र, आता थंडीच्या दिवसांत स्पंजिंगसाठी थंड पाणी वापरू नये. ऑक्सिजन पातळी सतत तपासत रहावी. ताप असेल तेव्हा मुलांना जास्त कपडे घालू नयेत. मुलांना अशा खोलीत ठेवावे जिथे हवा खेळती असेल. घशात खवखव होत असेल, तेव्हा मीठ घातलेल्या कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात, पौष्टिक आहार द्यावा. आई वडिलांनी सतर्क रहावे. मात्र घाबरून जाऊ नये, असे मत बालरोग तज्ञ डॉ. मंदार देशपांडे यांनी सांगितले.