औरंगाबाद - पाणी देणार नाही तर मतदान मिळणार नाही, अशी भूमिका औरंगाबादच्या सिडको भागातील नागरिकांनी घेतली आहे. गेल्या काही महिन्यांसापासून शहरातील पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. ८ ते १० दिवसांनी कमी दाबाने पाणी पुरवठा होतो तो पण फक्त ४० मिनिटेच होतो. त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही.
नागरिकांनी अनेक वेळा पाण्याच्या टाकीवर जावून आंदोलने केली. मात्र, त्याचा उपयोग न झाला नाही. त्यामुळे पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांनी 'पाणी द्या आणि मतदान घ्या' अशी भूमिका घेतली आहे. औरंगाबादमधील सिडको परिसर हा सर्वाधिक कर भरणारा परिसर मनाला जातो. मात्र, याच परिसरात नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. महानगरपालिका अधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार कोणीही पाणी समस्येला गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे ऐन-६ परिसरातील नागरिकांनी बैठक घेऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिकांनी रिकामे हंडे घेवून सर्वच उमेदवारांचा निषेध व्यक्त केला. पाणी देणार नसाल तर प्रचाराला देखील येऊ नका, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. औरंगाबादेत अनेक गावांनी आता निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय. औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील हर्षी गावात कोणताही राजकीय नेता जायला तयार नाही. कारण नेतेमंडळी आले तर चोप दिला जाईल, अशी भूमिका गावातील नागरिकांनी घेतली आहे. हर्षी गावात गावकऱ्यांनी होर्डिग लावत राजकीय नेत्यांना बंदी आहे. 'गावात जर कुणी मतदान मागायला आले तर चोप दिला जाईल' अशा प्रकारचा संदेश दिला आहे.
पैठण तालुक्यातील २३ वर्षांपासून रखडलेली ब्रम्हागव्हाण उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत ४० पेक्षा अधिक आंदोलने केली आहेत.प्रत्येक वेळी योजना पूर्ण करण्याचे आश्वासन राजकीय पक्षांच्यावतीने दिले जाते. मात्र अनेक निवडणुका होवूनही योजनेचा काम पूर्ण झाले नाही.