औरंगाबाद - शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत भंगार साचविणाऱ्या कंपनीला लागलेली आग विझविण्यासाठी तब्बल ३ लाख लिटर पाणी वापरावे लागले. हे पाणी दुष्काळग्रस्त भागांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या टँकरमधून घेण्यात आले. त्यामुळे अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला.
सोमवारी दुपारी शेंद्रा औद्योगिक वसाहतीत लाकडाच्या स्क्रॅपच्या गोदामाला अचानक आग लागली. ही आग एवढी मोठी होती की आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना १८ तासांचा अवधी लागला. आग विझवण्यासाठी एमआयडीसीचे तीन, महानगर पालिकेचे एक, गरवारे कंपनीचे एक असे पाच फायर इंजिन मागविण्यात आले होते.
ही आग विझविण्यासाठी जवळच असलेल्या जलकुंभावर आलेल्या पाण्याचे टँकर घटनास्थळी मागवावे लागले. दुष्काळी गावांना पाणी देणारे पाण्याचे टँकर अचानक आग विझविण्यासाठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीत पाठवावे लागले. याची झळ पाणी टंचाईग्रस्त गावांना बसली आहे. गोदामाला लागलेली आग विझविण्यासाठी जवळपास ३ लाख लिटर पाणी लागले. एवढेच नाही तर उद्योगाला लागणारे पाणीही देण्यात आले होते. कंपनीला लागलेल्या आगीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.