औरंगाबाद- सिटीचौक पोलिसांनी शाहगंज परिसरातील निझामुद्दीन चौकातील एका वाड्यात छापा मारत 23 गोवंश जनावरांची सुटका केली आहे. मात्र, या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांची अधिक कुमक मागविल्यानंतर तणाव निवळला आहे. दरम्यान शहरात दंगली सारख्या अनेक अफवांचे पेव फुटले होते. पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले.
बकरीईदच्या पार्श्वभूमीवर एका वाड्यात अनेक गोवंश जनावरे कत्तलीसाठी कैद करून ठेवले असल्याची गुप्त माहिती सिटी चौक पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास निझामुद्दीन चौकातील सलीम अब्बास कुरेशी यांच्या वाड्यावर छापा मारला. ही बाब एका स्थानिक एमआयएम नगरसेवकाला माहिती झाली त्यानंतर मोठा जमाव जमण्यास सुरुवात झाली.
साडेबारा वाजता सुरू झालेली कारवाई तब्बल साडेचार वाजेपर्यंत चालली. बंदी असलेले गोवंशच्या पहिल्या दोन गाड्या साडे तीन वाजता रवाना झाल्या. तर तिसरी गाडी तब्बल तासांभरानंतर तेथून निघाली. दरम्यानच्या काळात एमआयएमच्या एका नगरसेवकाने माध्यमाच्या प्रतिनिधींना शूटिंग आणि फोटो घेण्यास मज्जाव केला होता. त्यांचे कार्यकर्ते माध्यम प्रतिनिधींच्या अंगावर धावून येत होते आणि तेथे उपस्थित पोलीस अधिकारी देखील मध्यम प्रतिनिधींना कॅमेरे बाहेर काढू नका, अशा सूचना करीत होते.
संतप्त हजारो तरुणांचा जमाव होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तिसरी जप्त केलेली जनावरांची गाडी रवाना केली आणि तेथून काढता पाय घेतला. जप्त केलेली जनावरे पोलिसांनी गोशाळेत पाठवली आहे. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.