औरंगाबाद - काही वर्षांपूर्वी एकाचवेळी दीडशे मर्सिडीज कार खरेदी केल्याचा अनोखा विक्रम ( Mercedes Car Buying Record ) शहरात झाला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती होणार असून, यावेळी अडीचशे इलेक्ट्रिकल कार विकत घेण्याचा अनोखा उपक्रम ( Electric Car Buying Initiative ) राबवला जात आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत या सर्व गाड्या रस्त्यावर धावतील ( 250 Electric Car Will Be Purchased ), असा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला आहे.
औरंगाबादमध्ये मिशन ग्रीन मोबिलिटी उपक्रम..
पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे आणि इंधन वाचवणे याकरिता औरंगाबाद मिशन ग्रीन मोबिलिटी ( Aurangabad Mission Green Mobility 0 उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात औरंगाबाद शहर आणि मराठवाडा विभागात 1000 इलेक्ट्रिक दुचाकी, 250 चार चाकी, पन्नास बसेस आणि पाचशे तीन चाकी वाहने रस्त्यावर आणण्याचा मानस ठेवण्यात आला आहे. नवीन तंत्रज्ञानासाठी आवश्यक अशी यंत्रणेचा विचार करत, सार्वजनिक ठिकाणी सुलभ प्रवेशासह वीसहून अधिक चार्जिंग सेंटर उभारण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 250 इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा संकल्पसह हे मिशन सुरू करण्यात आले आहे. ही चार चाकी वाहन खरेदी करण्याची प्रक्रिया मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती ऑटो क्लस्टरचे संचालक आशिष गर्दे यांनी दिली.
नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी उपक्रम..
औरंगाबाद शहरात अनेक वेळा सामूहिक प्रयत्न असून, वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून औरंगाबाद आणि मराठवाडा विभागातील जबाबदार नागरिक आपले शहर स्मार्ट बनविण्याच्या दिशेने एक छोटा पाऊल टाकत आहेत, अशी माहिती मसीआचे माजी अध्यक्ष आणि उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी दिली. शहरामध्ये स्वच्छ आणि हरित योगदान देण्यासाठी उपक्रम राबवण्यात येत आहे. पुढील पिढीला स्वच्छ पाणी, हवा आणि माती देण्यासाठी हा प्रयत्न आहे. प्रदूषण कमी करणे, वाहनातून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या भविष्यातील पर्याय आहेत. याचा विचार करून सामूहिकरित्या वाहने खरेदी करण्याची संकल्पना पुढे आली. त्यावरुनच आता हा उपक्रम राबवला जातोय अशी माहिती मसीआचे माजी अध्यक्ष आणि उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी दिली.
इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी उपाय योजना..
जास्तीत जास्त नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करावी यासाठी ऑटॉक्लस्टरद्वारे विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये विशेष किंमत, विशेष सेवा, विमा आणि व्याजदरांचा विशेष ऑफर, प्रक्रिया शुल्क, आकर्षक दरात कर्ज आणि सरकारी इलेक्ट्रिकल वाहन पॉलिसीमध्ये प्रदान करण्यात येत असलेले इतर फायदे समजून सांगण्यात येत आहेत. नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, यासाठी शहरातील काही ठिकाणी चार चाकी वाहनांच्या चाचणी म्हणजे टेस्ट ड्राईव्ह उपलब्ध करून देण्यात येत आहेत, अशी माहिती मराठवाडा ऑटो क्लस्टरच्यावतीने आशिष गर्दे, प्रसाद कोकीळ आणि मुनीत शर्मा यांनी दिली आहे.