औरंगाबाद - गेल्या वर्षभरापासून राज्यसेवा पूर्व परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात असताना आता पुन्हा एकदा 14 मार्च रोजी होणारी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने पुढे ढकलून विद्यार्थ्यांना मोठा धक्का दिला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. शहरातील महात्मा फुले चौकात विद्यार्थ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.
सरकारविरोधात घोषणाबाजी
एमपीएससीने गुरुवारी परिपत्रक काढून राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने आता परीक्षा घेणे योग्य नाही, असे पत्र पुनर्वसन विभागाने १० मार्चला एमपीएससीला दिले होते. त्यांच्या सूचनेनुसार ही परीक्षा पुढे ढकलली जात आहे, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. दरम्यान वारंवार परीक्षा पुढे ढकलली जात असल्याने एमपीएसची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील महात्मा फुले चौकात एकत्रित येऊन विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पोलीसदेखील मोठ्या फौजफाट्यासह दाखल
काही दिवसांपूर्वीदेखील एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. विद्यार्थी महात्मा फुले चौकात जमा झाले. याची माहिती मिळताच पोलीसदेखील मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाले. यावेळी विद्यार्थांना शांततेचे आवाहन पोलिसांनी केले.