औरंगाबाद - आयकर विभागाच्या धाडी पडत असताना वेगवेगळ्या शक्कल लावल्या जात असल्याचे समोर आले आहे. जालना जिल्ह्यातील स्टील व्यापाऱ्यावर धाड टाकत असताना दुल्हन हम ले जायेंगे अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले होते. तर औरंगाबादेत सकाळपासून सुरू असलेल्या धाडसत्रात गाडीवर रक्षा स्थायी समिती अध्यायन दौरा असे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे कारवाई करत असताना ओळख स्पष्ट न होऊ देता, गुप्तता पाळून केली जात असल्याचे दिसून येत आहे.
व्यावसायिकाची तपासणी - शहरातील ज्योतीनगर भागातील व्यावसायिक सतीश व्यास यांच्या निवासस्थानी पहाटे चारच्या सुमारास आयकर विभागाचे पथक दाखल झाले. राजस्थानमध्ये मध्यान्ह भोजन देण्याचे कंत्राट व्यास यांच्याकडे होते. त्याबाबत ही तपासणी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सकाळपासून शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली आहे. मात्र नेमके कोणत्या बाबतीत तपासणी केली जात आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
व्यावसायिक शिवसेनेची निगडित - सकाळपासून चार ते पाच पथक शहरातील विविध ठिकाणी झाडाझडती घेत आहे. यापैकी काही ठिकाणे व्यास यांच्याशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती आहे. व्यवसायिक असलेली सतीश व्यास आणि त्यांचे कुटुंबीय शिवसेनेची निगडित आहेत. त्यांचा मुलगा मिथुन व्यास युवा सेनेचा पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे या कारवाईबाबत चर्चांना आता पुन्हा एकदा उधाण आले आहे.