औरंगाबाद - दिवाळीत फटाके फोडून आपण पर्यावरणाचा ऱ्हास करत आहोत. त्यामुळे फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प सर्वसामान्यांनी करावा, असे आवाहन प्रयास ग्रुपतर्फे करण्यात आले आहे. प्रदूषणमुक्ती करण्यासाठी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यासाठी फटाके न फोडणाऱ्या नागरिकांना रोप वाटप करण्यात आले.
दिवाळीच्या सणाच्या खरेदीसाठी सकाळीच नागरिक घराबाहेर पडतात. त्याचे औचित्य साधून प्रयास ग्रुप तर्फे विशेष गाणं सादर करण्यात आले. या गाण्यात फटाके न फोडण्याचा संकल्प करून पर्यावरणाला वाचवा, असा संदेश देण्यात आला. गिटार वाजवत सादर केलेल्या या गाण्याने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. ग्रुपमधील काही सदस्यांनी वृक्ष संवर्धनाची गाणी सादर करत दिवाळीची सकाळ निसर्गमय करण्याचा प्रयत्न केला.
सेल्फी पॉईंट ठरले आकर्षण
गजानन महाराज मंदिर परिसरात पर्यावरण वाचवण्यासाठी उपक्रम राबवत असताना येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांना प्रयासचे सदस्य फटाके फोडल्याने होणाऱ्या नुकसानाबद्दल माहिती देत होते. जे नागरिक सकारात्मक प्रतिसाद देत होते, त्या नागरिकांना एक झाड भेट देत होते. त्याच बरोबर "नो क्रॅकर, सेफ दिवाळी" लिहिलेल्या एका फ्रेमच्या माध्यमातून एक सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. फटाके न फोडण्याचा संकल्प करणाऱ्या प्रत्येकाचा सेल्फी काढून नागरिकांना प्रोत्साहन देण्यात आले.
तीन प्रकारच्या वृक्षारोपणाचा संकल्प
प्रयास ग्रुप गेल्या काही वर्षांपासून औरंगाबादसह आसपासच्या परिसरात वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे काम करत आहे. तीन प्रकारची झाडं लावण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतलाय. यामध्ये पारंपरिक वृक्ष ज्यामध्ये वड, पिंपळ अशी झाड यांचा समावेश होते. तर फळबाग लागवड ज्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग घेतला जातो आणि मियावाकी डेन्स फॉरेस्ट यामध्ये जंगल पद्धतीने झाडं वाढतात. पाच वर्षांत 10 लाख वृक्ष लागवड आणि संगोपनाचा संकल्प करण्यात आला आहे. आज पर्यंत जवळपास दीड लाख वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. औद्योगिक वसाहतीत वाढणारे प्रदूषण लक्षात घेता, औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत सर्वाधिक 75 हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे.
पक्षी आणि पाणी वाचवा उपक्रम घेणार हाती
वृक्ष लागवड उपक्रम राबवत असताना निसर्गाच्या सान्निध्यात वावरणारे पक्षी वाचवणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षी वाचवण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रयास ग्रुपचे प्रमुख रवी चौधरी यांनी सांगितले. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात जल संवर्धन करणे आवश्यक असून त्यासाठी पाऊलं उचलणार असल्याचे ते म्हणाले.