औरंगाबाद - नवीन वर्षाचे स्वागत करत असताना नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सरत्या वर्षाला निरोप देत असताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना तरुणाईही सज्ज झाली आहे. मात्र कोरोनाचे सावट लक्षात घेता काही नियम आणि अटी या घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री अकरानंतर कोणीही रस्त्यावर विनाकारण फिरू नये, विनाकारण कोणी रस्त्यावर फिरत असले किंवा जल्लोष करताना आढळून आले तर पोलीस कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
रात्री दहानंतर हॉटेल बंद करण्याच्या सूचना
नवीन वर्षाचे स्वागत करत असताना हॉटेलमध्ये जल्लोष करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मात्र यंदा घरीच जल्लोष साजरा करावा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रात्री दहानंतर हॉटेल व्यवसायिकांनी हॉटेल बंद करायला सुरुवात करावी लागणार आहे. रात्री दहानंतर हॉटेलमध्ये ग्राहकांना प्रवेश देऊ नये आणि रात्री अकराच्या आधी हॉटेल बंद करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचे नवीन वर्षाचे स्वागत घरूनच करावे लागणार आहे.
रस्त्यावर असणार पोलिसांची गस्त
पोलीस दलाकडून विशेष तयारीही करण्यात आलेली आहे. औरंगाबाद शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर पोलिसांचा गस्त असणार आहे. काही ठिकाणी चेकपॉइंट लावण्यात आलेले आहेत. शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व वाहनांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. वाहन तपासणीमध्ये मद्यप्राशन करणाऱ्या चालकांवर विशेष कारवाईही पोलिसांकडून केली जाणार आहे. इतकेच नाही तर वाहन तपासणी करत असताना वाहनांचे कागदपत्रदेखील तपासणी यावेळी करण्यात येणार आहे. औरंगाबाद शहरात तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. ज्यामध्ये दोन पोलीस उपायुक्त, पाच सहायक पोलीस आयुक्त, 21 निरीक्षक, 129 उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक आणि 744 जमादार असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यात वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी हे देखील रस्त्यावर रात्रभर तैनात असणार आहेत. कोणीही पोस्टर बॅनर किंवा रस्त्यावर उतरून जल्लोष करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आल आहे.