औरंगाबाद: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिना निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी सातच्यादरम्यान सिद्धार्थ उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न ( CM Eknath Shinde on Marathwada Liberation Day ) झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्वांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आणि कार्यक्रम आटोपुन ते रवाना झाले मात्र गृहमंत्री अमित शहांच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाचा सोपस्कार उरकल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परंपरा मोडल्याचा आरोप : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 9 वाजता होणारा कार्यक्रम सकाळी 7 वाजता उरकला त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यावर टीका सुरु केली आहे. आधितर मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का या बद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले होते पण ते दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले पण त्यांनी परंपरेनुसार सकाळी 9 वाजता होणारा कार्यक्रम सकाळी 7 वाजताच उरकुन घेतला आणि त्यांच्यावर टीका सुरु झाली.
थोडक्यात आटोपला कार्यक्रम : मुख्यमंत्री शिंदे हे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. आज ध्वजारोहन झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या विकास कामांची घोषणा केली. औरंगाबाद येथील कार्यक्रम आटोपून ते हैदराबादला रवाना झाले. हैदराबादमध्ये महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक, या तीन राज्यांचा मिळून मुक्तिसंग्रामाचा एक संयुक्त कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हजेरी लावली तेथे शिंदेही उपस्थित राहीले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे ध्वजारोहन केले.
काय म्हणाले मुख्यमंत्री: औरंगाबाद जिल्ह्यामध्ये घृणेश्वर मंदिराच्या विकासासाठी 157 कोटी त्यासोबत रस्ते आणि रेल्वे मार्गाने मराठवाड्याला जोडण्यासाठीची विकासकामेही वेगाने व्हावीत, यासाठी भरीव तरतूद केल्याचे त्यांनी या निमित्ताने बोलताना सांगितले तसेच मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटवण्यासाठी, दुष्काळ संपवण्यासाठी, पश्चिमी नद्यांचे पाणी वळवण्यासाठी आणि मराठवाड्याच्या विकासाला वेग मिळावा, यासाठी सरकार काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दानवेंनी साधला निशाना : आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनावरुनही आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. औरंगाबादमध्ये सकाळी सात वाजता घेण्यात आलेल्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमावरून त्यांनी शिंदेंवर निशाणा साधला. मराठवाडा मुक्तिसंग्रामाला मुख्ममंत्र्यांनी कमी वेळ दिला, त्यांना हैदराबादला जाण्याची घाई होती, असे दानवे यांनी म्हटले आहे.
खैरे म्हणाले जनतेचा अपमान झाला : या प्रकरणी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याच्या जनतेचा आणि स्वातंत्र सैनिकांचा अपमान झाल्याची टीका केली ते म्हणाले की, या दिवशी दरवर्षी सकाळी शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. मुख्यमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण होते. कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार होतो. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे. मात्अर मुख्यमंत्र्यानी कार्यक्रमाची औपचारिकता 15 मिनिटात पूर्ण केली. मुख्यमंत्री भाजप आणि केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
सरकारच्या मंत्र्यात बेबनाव : दरम्यान मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारंभाला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचीही अनुपस्थिती होती. त्यांनी मुख्य कार्यक्रमाला उपस्थित न राहता देवगिरी किल्ला येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावरून राज्यातील मुख्यमंत्री आणि त्याच्या मंत्र्यामध्ये बेबनाव असल्याचे दिसून येते असा आरोपही खैरे यांनी केला आहे. यावर्षी पासुन देवगिरी किल्ला येथेही अशाच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
राज ठाकरेंचा पत्रातुन इशारा: दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ट्विटर वरुन एक पत्र शेअर करत, निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचे अखंडत्वच धोक्यात आले असते. त्यामुळे आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीयेत तर आधुनिक सजा कार पण येऊन बसलेत. लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना रझाकार आणि सजा कार ह्या दोघांचा बंदोबस्त करेलच असा इशाराही त्यांनी दिला आहे.