औरंगाबाद - मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी व्यापाऱ्यांसाठी नवे आदेश जारी केले आहेत. यामध्ये कोरोना चाचणी केलेल्या दुकानदारांकडूनच सामान खरेदी करण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच तपासणी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मात्र या आदेशानंतर व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. चाचणी नेमकी कुठे आणि कधी करायची याबाबत स्पष्टता नसल्याने व्यापाऱ्यांनी विविध भागांमध्ये गोंधळ घालत आयुक्तांच्या निर्णयाला विरोध केला आहे.
औरंगाबाद शहरासह आसपासच्या परिसरात नऊ दिवसांचा बंद पुकारण्यात आला होता. त्याला सर्वच नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. 19 जुलै रोजी बंदचा कालावधी संपणार असून व्यापार पुन्हा सुरू होणार आहे. मात्र बंद संपायच्या वेळेस मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांनी नवीन आदेश जारी केले. त्यानुसार ज्या व्यापाऱ्यांकडे कोरोना तपासणीचे प्रमाणपत्र नसेल त्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे व्यापारी संभ्रमात असल्याचे चित्र आहे.
रविवारी व्यापार सुरू करायचा असल्यास आधी आपली तपासणी करून घेण्यासाठी शनिवारी शहरातील प्रत्येक भागात असलेल्या कोविड सेंटरवर व्यापाऱ्यांनी गर्दी केली. मात्र व्यापाऱ्यांच्या तपासणीबाबत कुठल्याही सूचना अद्याप आल्या नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे आता प्रमाणपत्र मिळवायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. एकाच दिवसामध्ये इतक्या व्यापाऱ्यांच्या तपासण्या कशा शक्य होणार,असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत आयुक्तांनी फेरविचार करावा. अन्यथा सर्वांच्या तपासण्या लवकरात लवकर करण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मुळात नऊ दिवसांसाठी हा बंद होता. या बंदच्या काळात सर्वांच्या तपासण्या करून घेतल्या असत्या, तर आता ही अडचण निर्माण झाली नसती, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत नऊ दिवस व्यापार बंद होता. आता पुन्हा एकदा व्यापार सुरू करण्यासाठी आयुक्तांनी लावलेले नियम चुकीचे असल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.