औरंगाबाद - घाटी रुग्णालयातील परिचारिकांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन केले. रुग्ण अधिक आणि कर्मचारी कमी अशी अवस्था असल्याने कामाचा वाढणारा ताण आणि सोयीसुविधांचा अभाव यामुळे तीनशे परिचारिकांनी आंदोलन केले.
घाटी रुग्णालयात येतात सर्वाधिक रुग्ण
औरंगाबादचे घाटी रुग्णालय गोरगरिबांना जीवनदान देणार रुग्णालय अशी ओळख असणार रुग्णालय आहे. जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात. असे असले तरी आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने रुग्णालय स्वच्छतेसह रुग्णसेवा देण्यास अडचण येते. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होतो. त्यात कामाचे नियोजन नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठा ताण जाणवतो. त्यामुळे कामाचे नियोजन करून आरोग्य सेवकांची भरती करा, या मागण्या आंदोलनात परिचरिकांनी मांडल्या.
'गरीब रुग्णांना औषधे उपलब्ध करा'
घाटी रुग्णालयात हजारो रुग्ण रोज येत असतात. मुख्यतः उपचारासाठी आलेले रुग्ण गरीब असतात. त्यांच्यावर डॉक्टर उपचार करून निघून जातात, मात्र त्यांना मोफत किंवा स्वस्त औषध उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या गरीब रुग्णांना उपचार घेण्यास अडचणी येत असतात. त्यामुळे लवकरात लवकर औषधी उपलब्ध करून द्यावी, आरोग्य सेवकांना रुग्णसेवा देताना लागणारे साहित्य उपलब्ध करून घ्या, अशी मागणी आंदोलक परिचारिका आणि परिचारिकांनी केली.
'एक महिन्यात अडचणी होतील दूर'
कोविड काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. मात्र कोविड संपल्यावर ते कर्मचारी कमी केल्याने अनेक अडचणी आल्या, मागील साठ वर्षात घाटी रुग्णालयाने दिलेल्या आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना इथल्या सेवेवर विश्वास बसला आले. त्यामुळे पहिल्यापेक्षा रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. त्यामानाने आरोग्य सेवक आणि यंत्रणा कमी पडते. मात्र एक महिन्यात 50 टक्के रिक्त जागा भरण्यात येतील, अशी माहिती आरोग्य संचालकांनी दिल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. त्याचबरोबर औषधांबाबत ऑनलाइन पोर्टल सुरू झाले असून त्यामुळे औषधांचा किती साठा शिल्लक आहे, याची राज्यस्तरीय माहिती मिळणार आहे. आता एक महिना पुरेल इतका औषधी साठा असून यापुढे औषधांची समस्या येणार नाही, असा विश्वास अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी व्यक्त केला.