औरंगाबाद - महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला औरंगाबादेत व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला नसल्याचं पाहायला मिळालं. व्यावसायिकांनी आपली दुकाने उघडी ठेवत महाराष्ट्र बंदला केराची टोपली दाखवली.
व्यापाऱ्यांचा बंदला विरोध
जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या बंदला विरोध दर्शवला आहे. गेल्या दीड वर्षापासून बाजारपेठा बंद आहेत. अनेक निर्बंध असल्यामुळे व्यवसाय करण्यास अडचणी देखील निर्माण होत आहेत. यात सणासुदीचे दिवस असून व्यवसाय स्थिरावत आहे. यावेळेस बंद पुकारला गेल्याने व्यवसायावर पुन्हा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही या बंदला पाठिंबा देऊ शकत नाही. मात्र, ज्या व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा द्यायचा आहे. त्यांनी द्यावा अशी भूमिका व्यापारी महासंघाने घेतली होती. त्यामुळे सोमवारी शहरांमध्ये बंदचा विशेष परिणाम दिसला नाही.
शेतकऱ्यांसाठी बंद पुकारल्याची भूमिका
महाविकास आघाडीच्या वतीने बंद पुकारला आहे. कारण दिल्लीमध्ये गेल्या वर्षभरापासून शेतकरी आणि केंद्र सरकार असा संघर्ष दिसून येत आहे. हा संघर्ष चालू असताना केंद्र सरकार मात्र कुठेही शेतकऱ्यांना दिलासा देत नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम करत आहे. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले, त्यांचा आंदोलन बंद पाडण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न केले. इतकेच नाही तर आता भाजपच्या एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडून मारला आहे. अशा पद्धतीने भाजप शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी महाविकास आघाडीने हा बंद पुकारला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका असल्यानेच हे आंदोलन पुकारण्याचा महाविकास आघाडीच्या वतीने सेनेचे आमदार अंबादास दानवे आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा - MaharashtraBandh : महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून हुतात्मा चौकात निदर्शने