औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अद्यावत अशी कोव्हिड चाचणी लॅब उभारली जात आहे. ही नुसती लॅब नसून या ठिकाणी साथीच्या आजारांवर संशोधन देखील केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत कोव्हिड 19 चे विशेष रुग्णालय उभारले जात आहे. कोरोना पूर्णतः बरा झाल्यावर हा दवाखाना आरोग्य विभागाला दिला जाणार आहे. तिथे साथीच्या आजारांवर उपचार केले जातील अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.
राज्यात अनेक उद्योग सुरू करण्यात आले आहेत. काही अडचणी आहेत, मात्र त्या सोडवण्याचे प्रयत्न केले जात आहे. लाखो कामगार कामावर रुजू झाले आहेत. उद्योगांना उभारी देण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. लघु-मध्यम उद्योगांना काही सवलती देण्याचा विचार सरकार तयार करत असून लवकरच त्याबाबत घोषणा करण्यात येईल, असेही सुभाष देसाई यांनी सांगितले.
राज्यातून मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर त्यांच्या राज्यात गेले आहेत. मात्र ते कायमचे गेलेले नाहीत. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर ते परत येतील, याची शक्यता आहे. आधी यांची नोंद नव्हती, मात्र आता यापुढे परराज्यातून येणाऱ्या मजुरांची नोंद सरकार घेईल. आता स्थानिक बेरोजगार युवकांना संधी आहे, ती त्यांनी सोडू नये, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.