औरंगाबाद - शहरात लावलेला जनता कर्फ्युचा शनिवारी शेवटचा दिवस असून रविवार पासून बाजार पेठांमध्ये स्थिती पूर्ववत होणार आहे. असे असले तरी पुढील दोन दिवसांमध्ये भाजी, फळ, दूध, अंडी, मांस विक्रेते आणि सलून चालकांची अँटीजन तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.
शहरातील संचारबंदी संपण्याच्या आधी शहरातील व्यापारी आणि उद्योजकांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत ३१ जुलैपर्यंत असणाऱ्या परिस्थिती बाबत आढावा घेण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय आणि पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत लॉकडाऊनच्या काळातील तपासणी अहवाल आणि नंतर होणारे बदल याबद्दल पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
औरंगाबाद जिल्ह्यात १० ते १८ जुलै पर्यंत असलेल्या संचारबंदी काळात १८ हजार ८७८ कोरोना ॲंटीजन रॅपिड टेस्ट झाल्या. राज्यात सर्वाधिक रॅपिड टेस्ट या औरंगाबाद जिल्ह्यात झाल्या असुन यात सुमारे ८०० रुग्ण आढळले. त्याव्यतिरिक्त ८५०० नियमित कोविड चाचण्याही करण्यात आल्या. सुरुवातीच्या ५००० कोरोनाबाधितांपैकी २४७ मृत्यू झाले होते मात्र नंतरच्या ५००० कोरोनाबाधिंतापैकी १४० मृत्यू झाले असून प्रशासन मृत्यूदर कमी करण्यात यशस्वी झाले असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी स्पष्ट केले. हा मृत्यूदर कमीतकमी आणण्याचा किंबहुना मृत्यू होऊच नये यांवर प्रशासन काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. येणारी बकरी ईद व श्रावण महिना हा आपण सार्वजनिक ठिकाणी साजरा न करता राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार घरीच साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केले.
तरच परवानगी-
औरंगाबादेतील भाजी विक्रेते, दूध विक्रेते, अंडी व मास विक्रेते, किराणा दुकानदार व सलून चालक या सर्वांची आजपासून कोरोना ॲंटीजन रॅपिड टेस्ट होणार असून ज्यांचे अहवाल नकारात्मक येतील त्या विक्रेत्यांना महानगर पालिका प्रमाणपत्र देणार असून त्यांनाच दुकाने उघडण्याची परवानगी असणार आहे, असे महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यासाठी महापालिकेने २५ पथक तयार केली असून दोन ते तीन दिवसात या चाचण्या पुर्ण केल्या जातील तसेच व्यापारी संकुल किंवा बाजारपेठा येथे महापालिकेमार्फत शिबीर घेतली जातील, असे सांगत व्यापारांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी केले. मिशन बिगीन अगेन- २ या राज्य सरकारच्या मार्गदर्शक नियमांवलीप्रमाणेच उद्यापासून संचारबंदी उठवली जाणार असून नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन औरंगाबाद प्रशासनाने पत्रकार परिषदेत केले.