औरंगाबाद - युक्रेन आणि रशियाच्या वैद्यकीय शुल्कचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास समिती काम करत आहे. त्या देशाप्रमाणेच राज्यात कमी शुल्क लावता येतील का? याचा गांभीर्याने विचार सुरू आहे. अहवाल आला की तो राज्यसमोर मांडला जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. युक्रेन आणि रशियामध्ये वैद्यकीय शुल्क अत्यंत कमी असल्याने भारत आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जातात. भारतातील वैद्यकीय शुल्क भरमसाठ आहे. या विषयी बोलतांना वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
भाजपा खासदार छत्रपती संभाजीराजे सोबत काम करणार असल्याच मान्य केले असे विधान वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले आहे. औरंगाबाद येथील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते. छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आम्ही सर्वांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर त्यांनी उपोषण सोडले, यावेळी संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीच्या कारभाराला पसंती दिली. विश्वास व्यक्त केला, एकत्र काम करण्याची ग्वाही दिली, असे अमित देशमुख यांनी सांगितले. मात्र मराठा आरक्षण संदर्भात जे आंदोलन संभाजीराजे यांनी छेडले, ज्या मागण्या त्यांनी मांडल्या, त्यांच्या या मागण्या महाविकास आघाडी सरकारने मान्य करून मंजुरी दिली. त्या चर्चेमध्ये ज्या मागण्या आहे, त्याला अंतिम स्वरुप येईपर्यंत एकत्र काम करण्याची त्यांनी भावना व्यक्त केली त्याचा तो संदर्भ होता, असे स्पष्टीकरण अमित देशमुख यांनी दिले.
'महाविकास आघाडी फार्म्यूला देशात होईल'
महाराष्ट्रात महाविकास आघाडीने चांगले काम करून दाखवला आहे. याच धर्तीवर देशातही महाविकास आघाडीचा प्रयोग केला जाऊ शकतो. त्याचे नेतृत्व राहुल गांधी करतील, असे मत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात पहिल्यांदा आघाडीचा प्रयोग केला. त्याची परंपरा सुशिलकुमार शिंदे यांनी पुढे चालविली. आता भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कामाला लागले पाहिजे. यासाठी बैठक घेतल्याच अमित देशमुख यांनी सांगितले.
हेही वाचा - 40-mile Russian convoy: 40 मैलांचा रशियन काफिला; गोळीबार तीव्र करण्याची कीवला धमकी