औरंगाबाद - कोरोनाबाधित मृतांवर मोफत अंत्यसंस्कार मसणजोगी समाजासमोर महानगरपालिकेच्या समोर हात पसरण्याची वेळ आळी आहे. मागील सहा महिन्यांपासून मोफत अंत्यविधी करूनही महानगरपालिकेने शहरातील 42 स्मशानभूमींचा जवळपास 35 लाखांचा निधी अद्याप दिला नसल्याने मसणजोगींवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे एक मार्चपासून मोफत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असा इशारा समाजाने दिला आहे.
कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार करूनही पैसे नाहीत
कोरोनाकाळात रुग्णांवर मोफत अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शहरातील 42 स्मशानभूमींत मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून महानगरपालिकेकडून दिला जाणारा निधी मिळाला नसल्याने मसणजोगी हवालदिल झाले आहेत. गेल्या सहा महिन्यात 874 कोरोनाबाधित मृतांवर आणि ४०० मोफत अंत्यविधी योजनेंतर्गत मृतांवर अंत्यविधी करण्यात आले. अंत्यविधींबाबत अहवाल पालिकेत सादर करण्यात आला असला, तरी अद्याप महानगरपालिकेने निधी दिला नसल्याने मसणजोगी समाजावर आर्थिक संकट ओढवले आहे.
'लाकडे आणण्यासाठी पैसे नाहीत'
कोविडबाधित मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आणि डॉक्टर बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यविधी योजनेंतर्गत अंत्यविधी केल्यावर महानगरपालिकेकडून अडीच हजार रुपयांचा निधी देण्यात येतो. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून महानगरपालिकेने स्मशानभूमी चालकांना हा निधी दिला नाही. शहरातील 42 स्मशानभूमींमध्ये गेल्या सहा महिन्यात जवळपास १३०० मोफत अंत्यविधी करण्यात आले. हे करत असताना लागणारा खर्च मसणजोगींनी आपल्या खिशातून केला. महानगरपालिकेतून निधी मिळेल त्यामुळे हे अंत्यविधी करण्यात आले. मात्र पालिकेने सहा महिन्यांपासून निधी न दिल्याने अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य आणायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड, गवरी आणि इतर साहित्य अनेकवेळा उधारीवर आणावे लागत आहे. मात्र आता उधारी किती दिवस करायची, असा प्रश्न निर्माण झाल्याचे मत पुष्पनगरी येथील मसणजोगी गोविंद गायकवाड यांनी उपस्थित केला.
'कोविडकाळात पुरवल्या नाहीत सुविधा'
कोरोनाकाळात बाधित मृत्यूंची संख्या वाढली होती. त्यावेळी मृत रुग्णांच्या नातेवाईकांनादेखील अंत्यसंस्काराला येण्यास बंदी होती. त्या काळात स्मशानभूमीत काम करणाऱ्या मसणजोगींनी आपल्या आरोग्याची चिंता न करता बाधित मृतांवर अंत्यसंस्कार केले. तेव्हा महानगरपालिकेकडून कुठल्याच सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. मात्र जून महिन्यात कैलासनगर स्मशानभूमीत काम करणाऱ्या दोन मसणजोगीचा मृत्यू कोरोनामुळे झाला. तेव्हा महानगरपालिकेचे झोपलेले प्रशासन जागे झाले आणि त्यांनी 10 पीपीई कीट आणि दहा मास्क स्मशानभूमीत काम करणाऱ्या लोकांना दिल्या. मात्र इतकेच साहित्य नेहमी कामी येईल का? असा प्रश्न मसनजोगी यांनी उपस्थित केला. कुठलीही सुविधा नसताना पदरचे पैसे खर्च करून आपला जीव धोक्यात घालत अंत्यविधी करूनही महानगरपालिका वेळेवर निधी देत नसल्याने मसणजोगी अडचणीत सापडले आहेत.
एक मार्चपासून मोफत अंत्यविधी करण्यास नकार
मोफत अंत्यविधी योजनेंतर्गत करण्यात येणारे अंत्यविधी एक मार्चपासून होणार नाहीत, असा इशारा औरंगाबाद शहरातील मसणजोगी समाजाने दिला आहे. शहरात 42 स्मशानभूमी असून या सर्वांचा निधी महापालिकेने अद्याप दिलेला नाही. त्यामुळे आर्थिक कोंडी निर्माण झाली असून कठीण काळात सुविधा देऊनही जर आर्थिक झळ पोहोचणार असेल तर आम्ही यापुढे मोफत अंत्यसंस्कार करणार नाहीत, असे पत्र महानगरपालिका प्रशासन आस्तिक कुमार पांडेय यांना देण्यात आले आहे.