औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ऐक्य परिषदेची हाक दिली आहे. 9 ऑक्टोबररोजी ही परिषद बोलवण्यात आली असून मराठा नेत्यांनी राजकीय जोडे बाहेर ठेऊन एकत्र यावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या औरंगाबादच्या समन्वयकांनी केले.
मराठा क्रांतीमोर्चाच्या समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत मराठवाड्यातील आणि औरंगाबादमधील समन्वयकांना टाळण्यात आले. ज्या औरंगाबादमधून मोर्चांना सुरुवात झाली त्या भागाला दूर करण्यात आले, अशाने आरक्षणाचा लढा कसा लढणार, त्यामुळे ही ऐक्य परिषद घेऊन सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे मत चंद्रकांत भराड यांनी व्यक्त केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 2016 पासून राज्यात 58 मोर्चे काढण्यात आले. शांततेत पहिल्यांदाच आपल्या मागण्यासाठी अशा पद्धतीचे मोर्चे निघाले. राज्य सरकारने आपली बाजू योग्य पद्धतीने मांडली नाही, त्यामुळे बीडमध्ये युवकाला आत्महत्या करण्याची वेळ आली. मराठा युवकांचा संयम सुटत चालला आहे. अशात मराठा क्रांतीमोर्चाच्या समन्वयकांनी एकत्रीत राहून आरक्षणासाठी लढा उभारण्याची गरज आहे. त्यामुळेच राज्यातील समन्वयकांना एकत्रित आणण्याची गरज असल्याने 9 ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ऐक्य परिषदेची हाक दिली असल्याची माहिती चंद्रकांत भराड यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन दिली.