औरंगाबाद - पैसे असतील तर विकत घ्या, गरज असेल, तर मोफत भाजीपाला घेऊन जा असा फलक लावून भाजी विक्रेता गरिबांच्या मदतीसाठी धावून आला आहे. पैसे नसलेल्या लोकांसाठी औरंगाबादच्या भाजी विक्रेत्याने मदतीचा हात पुढे केला. सचिन लबडे असे या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. त्याच्या या मदतीचे कौतुक होत आहे.
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या भीमनगर भावसिंगपुरा येथे सचिन भाजीविक्रीचा व्यवसाय करतो. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या एका आजीला मदत केल्यावर तिच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंनी गरजूंना मदत करण्याचा निश्चय केल्याचे राहुल लबडे याने सांगितले.
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांचे हाल होत आहेत. त्यात अनेक सामाजिक संघटना मदतीसाठी पुढे आल्या आहेत. त्यात औरंगाबादच्या सचिन लबडेने खारीचा वाटा उचलला आहे. राहुल काही महिन्यांपूर्वी खासगी कंपनीत काम करत होता. काही कारणास्तव त्याने ती नोकरी सोडली आणि दुसऱ्या कंपनीत कामाला सुरुवात केली. मात्र अचानक लॉकडाऊन लागले आणि हातचे काम गेले. त्यामुळे त्याने आपल्या वडिलांचे भाजीपाला विक्रीचे काम करायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी एका आजीला भाजी घ्यायची होती. तिच्याकडे पाच रुपयेच होते. त्यात भाजी दे असा आग्रह आजीने केला. एका जणाकडे पन्नास रुपये अडकलेत आले की आणून देईल, अशी विनंती आजीने केली. त्यामुळे राहुलला आजीच्या परिस्थितीचा अंदाज आला आणि त्याने तशीच भाजी देऊन टाकली. त्यावेळी आजीने आशीर्वाद देत असताना तिच्या डोळ्यातील अश्रूंनी राहुलला देखील भरून आलं.
राहुलने त्यानंतर कोरोनाच्या काळात गरजूंना मदत करण्याचा निश्चय केला. आपल्या वडिलांना विश्वासात घेऊन आपली परिस्थिती जेमतेम असली तरी गरजूंना होईल तशी मदत करण्याच त्यांनी ठरवले. आणि आपल्या गाडीवर पैसे असल्यास विकत घ्या आणि गरज असल्यास मोफत न्या असा फलक लिहिला. रोज अनेक लोक विकत भाजी घेतात काही लोकांकडे पैसे कमी असले, तर आहे तितक्या पैशात हवी तेवढी भाजी देण्याचे काम राहुल आणि त्याचे वडील करत आहेत. लबडे कुटुंबीयांनी सारखा मदतीचा हात इतरांनी दिला तर लॉकडाऊनच्या काळात अनेक गरीब कुटुंबाना आधार मिळेल हे मात्र नक्की...