औरंगाबाद - लॉकडाऊनमध्ये घरी जाऊन कराटे शिकवत असताना ४१ वर्षीय शिक्षकाने अठरा वर्षांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. बुधवारी (३० जून) तिचा अठरावा वाढदिवस झाला आणि ती सज्ञान झाल्याचा आधार घेत त्याने तिला स्वतःच्या घरी नेले. हा प्रकार कळल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी त्याच्या घरी जात मुलीला परत नेण्याचा प्रयत्न केला. मुलीने घरी परतण्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला. मात्र, पुंडलिकनगर पोलिसांनी धाव घेत दोन्ही कुटुंबांना ठाण्यात नेले. त्यामुळे हाणामारी टळली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंडलिकनगरमध्ये राहणारी बीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी नेहा (नाव बदलले आहे) काही महिन्यांपासून राजू नामक शिक्षकाच्या कराटे वर्गाला जात होती. त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. मग राजूने लॉकडाऊनचे कारण पुढे करत तिला घरी जाऊन वैयक्तिक प्रशिक्षण देणे सुरू केले. काही काळातच त्यांच्यातील जवळीकीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, ती अल्पवयीन असल्याने त्याने तत्काळ हालचाल केली नाही. बुधवारी तिचा १८ वा वाढदिवस होताच गुरुवारी (१ जुलै) तो तिला घरी घेऊन गेला.
मुलीच्या आईला संशय आला होता पण..
राजू नेहाला भाची म्हणायचा तिच्या कुटुंबातील सर्वांशी खूपच आपुलकीने बोलायचा. दुसरीकडे कराटे शिकवताना नेहाच्या अंगचटीला जात होता. पण ती त्याला विरोध दर्शवत नव्हती. त्यामुळे तिच्या आईला संशय आला होता. परंतु, ठोस पुरावा नसल्याने तिने बोलणे टाळले. मात्र, गुरुवारी सकाळी मुलगी गायब झाली अन् त्यांचा संशय खरा निघाला.
दुसऱ्या दिवशी केला विवाह..
नेहा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राजूच्या घरी राहण्यास गेल्याचे कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या मुलीनेच कॉल करून त्यांना ही माहिती दिली. राजूचे दोन विवाह झाले आहेत. त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाप्रकरणी भादंवि ४९८ अंतर्गत गुन्हाही दाखल आहे. दुसऱ्या पत्नीपासून त्याला तेरा, सोळा वर्षांच्या दोन मुली आहेत. नेहाला तो घरी घेऊन गेल्याचे कळल्यावर तिचे कुटुंबीय गुरुवारी त्याच्या घरी पोहोचले. तेव्हा त्याच्या सोळा वर्षांच्या मुलीने दरवाजा उघडला.
नेहाचे कुटुंब आले आहे. त्यांनी विरोध नोंदवला हे कळल्यावर माझा या नात्यावर काहीही आक्षेप नाही असे म्हणत त्या सोळा वर्षांच्या मुलीनेच पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल केला. नियंत्रण कक्षाकडून निरोप मिळताच पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, उपनिरीक्षक मीरा चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणत नेहा तिचे कुटुंबीय, राजू, त्याची पत्नी व मुलीला पोलीस ठाण्यात नेले. पोलीस ठाण्यातून घरी गेल्यानंतर दोघांनी एकमताने अग्रिमेंट करत विवाह केला. यासाठी त्यांनी नियमानुसार संपूर्ण प्रक्रिया पार पडली.