औरंगाबाद - भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीयमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिला आहे. गायकवाड हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते राज्य मंत्रिमंडळात मंत्री होते.
हेही वाचा - खऱ्या अर्थाने 'आत्मनिर्भर' असणारी ओदानथुरई पंचायत
मराठवाडा पदवीधर मतदार संघातून उमेदवारी न दिल्याने नाराज -
मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर जयसिंगराव गायकवाड यांनी बंडखोरी करत अर्ज सादर केला होता. आता बंडखोरी करणार नाही, मात्र आता पक्षातही राहणार नाही, अशी भूमिका जयसिंगराव गायकवाड यांनी जाहीर करत भाजपच्या सर्वच पदांचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.
जयसिंगराव गायकवाड तीन वेळा होते खासदार -
जयसिंग गायकवाड तीनवेळा बीड मतदार संघात खासदार होते. खासदार असताना केंद्रात भाजपची सत्ता असताना केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. तर त्याआधी मराठवाडा पदवीधर मतदार संघात दोनवेळा आमदार म्हणून ते निवडून आले होते. हा मतदारसंघ भाजपचा पारंपारिक मतदार संघ असल्याने तो पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची इच्छा होती, मात्र पक्षाने उमेदवारी नाकारल्याने जयसिंगराव गायकवाड यांनी त्यांच्याकडे असलेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
हेही वाचा - बिहार निवडणुकीतील पराभवानंतर आज काँग्रेसची महत्वाची बैठक