औरंगाबाद - प्लास्टिक खेळणीच्या नावाखाली डीटीडीसी या कुरिअरच्या माध्यमातून पंजाब येथून तब्बल 36 तलवारी आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Swords Arrived By Courier In Aurangabad ) दरम्यान, या तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या तलवारी घातपाताच्या उद्देशावर मागवल्या आहेत का ? या संदर्भात पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
36 तलवारी जप्त केल्या - निराला बाजार परिसरामध्ये डीटीडीसी या कुरियर कंपनीचे ऑफिस आहे. येथे तलवारी मागवल्या असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांना मिळाली. (Aurangabad courier case) त्यानंतर या माहितीच्या आधारे त्यांनी क्रांतीचौक पोलिसांच्या पथकाच्या मदतीने सापळा रचून तब्बल 36 तलवारी जप्त केल्या.
उद्देश काय होता - पंजाबमधील अमृतसर येथून कुरियर आले. यावर अर्धवट नावे असून मोबाइल क्रमांक आहेत. त्यामुळे संबंधित पत्त्यावर राहणारी व्यक्ती तीच आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. तलवार मागवणारे ग्राहक पकडल्याशिवाय त्यांचा उद्देश काय होता, हे स्पष्ट होणार नाही, अशी माहिती उपायुक्त वनकर यांनी दिली.
या अगोदर तीन वेळा कारवाई - शहरातील वेगवेगळ्या भागात कुरिअर कंपनीच्या माध्यमातून खेळणीच्या नावाखाली धारदार शस्त्र मागवण्याचा प्रकार तीन वेळेस उघडकीस आला आहे. यावेळी पोलिसांनी 100 पेक्षा अधिक तलवारी जप्त केलल्या होत्या. त्यामुळे धारदार शस्त्र येणार असल्याची माहिती संबंधित कंपनीला देखील असू शकते अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कोणी अन् किती मागविल्या तलवारी ? - असिफ एस. के. (रा. डी मार्टजवळ, जालना) याच्या नावाने आलेल्या कुरियरमध्ये तब्बल १६ तलवारी आहेत. शेख रोजा (रा. साईबाबा पुतळा, कागजीपुरा, औरंगाबाद) याने मागविलेल्या पार्सलमध्ये सहा तलवारी आहेत. राजू शेख (रा. रायली गल्ली, नीना फंक्शन हॉल) याने मागविलेल्या पार्सलमध्ये दहा तलवारी आणि एक कुकरी आहे.
प्रत्येकी एक तलवार मागवली - योगेश पवार (रा. आर. एल. स्टील कंपनी, पैठण रोड, चितेगाव) याने दोन तलवारी मागविल्या. अफसर खान (रा. आरीफनगर, मिसारवाडी), नावे अर्धव तुषार (रा. बी ७५, न्यू एसटी कॉलनी, एन-२, सिडको) आणि आदित्य शिरगुळे (रा. विठ्ठल मंदिर, कन्या शाळेजवळ, जालना) यांनी प्रत्येकी एक तलवार मागवली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा - Mamata letter To Opposition : पाच राज्यांतील अपयश! एकत्र येण्याबाबत विरोधी पक्षांना ममतांचे पत्र